नवी दिल्ली : नोटबंदीचा ऐतिहासीक दिवस भारतीय कधीही विसरणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता भारतीय बाजारातील प्रचलित नोटा बाद (Demonetisation) केल्या होत्या. काळा पैसा रोखण्यासाठी आणि स्विस बँकेतील पैसा परत आणण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी हे पाऊल टाकलं होते. आता त्यातून काय सिद्ध आणि काय साध्य झाले, ते काय वेगळं सांगायची गरज नाही. केंद्र सरकारची याविषयावरील मौनच त्याला खरं उत्तर आहे. त्यावेळी देशातून 500, 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बाजारात दाखल केल्या. 500, 200,100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा आणल्या. पण आता 2000 रुपयांच्या नोटा (Note) एटीएममधून (ATM) निघत नसल्याने याविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
2000 रुपयांच्या नोट आकाराने मोठी होती. ती एटीएममध्ये बसत नव्हती. तेवढ्यासाठी सर्वच बँकांनी एटीएमध्ये बदल केला. त्यासाठी खर्च केला. दोन हजारांची नोट एटीएममधून जमा करण्यात आली. या नोटा एटीएममधून निघू लागल्या. पण गेल्या एक वर्षांहून अधिका काळापासून या गुलाबी नोटा गायब झाल्या आहेत. या गुलाबी नोटांचा दुष्काळ पडला की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना बेचैन करु लागला. त्यांना याविषयीचे उत्तर हवं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयीचे उत्तर दिले.
सीतारमण यांचा दावा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएममधून दोन हजार रुपयांची नोट गायब झाल्याबाबत दावा दाखल केला आहे. सोमवारी त्यांनी लोकसभेत याविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिले. केंद्र सरकारने बँकांना याविषयीचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा भरण्याबाबतचा निर्णय बँकांचा आहे. या नोटांचा उपयोग, तांत्रिक कारणं, ग्राहकांच्या गरजा आणि वातावरणाचा परिणाम यामुळे हा निर्णय घेण्यात येतो. केंद्र सरकारने याविषयी बँकांना कोणतेही निर्देश दिले नसल्याचा दावा त्यांनी केला.
नोट बंद करण्याची योजना नाही
यापूर्वी केंद्र सरकारला, दोन हजार रुपयांची नोट बंद करण्यात आली आहे का? नोट बंद करण्याची योजना आहे का? याविषयीची विचारणा करण्यात आली होती. केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी यासंबंधीचे उत्तर दिले. त्यानुसार, आरबीआयने 2016 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांचे डिझाईन तयार केले आहे. त्यात बदल होणार नाही. तसेच दोन हजार रुपयांची नोट बंद करण्यात येणार नाही. पण 2019 ते 2020 या कालावधीत दोन हजार रुपयांच्या किती नोटा छापल्या याविषयीची थेट माहिती देण्यात आली नाही.
सोमवारी लोकसभेत खासदार संतोष कुमार यांनी महत्वपूर्ण प्रश्न विचारला. जवळपास 9.21 लाख कोटी रुपयांच्या 500 आणि 20 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच दोन हजारांची नोट बंद झाल्याविषयी माहिती विचारली. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी, अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचा दावा केला.