नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : सध्या सणासुदीची धामधूम सुरु होत आहे. पुढील दोन महिने भारतात सणांचा उत्साह राहील. या काळात देशातील बाजारापेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. नागरिक शॉपिंगसाठी (Shopping) घराबाहेर पडतात. भारतीय नागरीक पार्टी वेअर, फॉर्मल आणि इतर कपड्यांची जोरदार खरेदी होत आहे. पण एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील नागरिक अंडरवेअर आणि इनरवेअर कमी खरेदी करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील ब्रँड जॉकी, डॉलर, रुपा या कंपन्यांची विक्री घसरली आहे. सणासुदीत फॅशनेबल कपड्यांची विक्री वाढली आहे. तर अंडरवेअरची विक्री घटली आहे. मुलं, महिला आणि पुरुष या सगळ्या कॅटेगिरीमध्ये हा प्रकार समोर आल्याने कंपन्या धास्तावल्या आहेत. तर अर्थतज्ज्ञांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण लिपस्टिक आणि अंडरवेअरची विक्री (Underwear Sale) कमी झाले तर अर्थशास्त्राच्या नियमानुसार काय होते, हे त्यांना पक्के ठाऊक आहे.
का झाली खरेदी कमी
तज्ज्ञांच्या मते, भारतात महागाई वाढल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीच नागरिकांचा पैसा खर्ची पडत आहे. त्यामुळे अंडरवेअर आणि इनरवेअरच्या खरेदीकडे दुर्लक्ष होत आहे. डिसेंबर 2022 मधील शेवटच्या तिमाहीत अंडरवेअर वापरात 55 टक्के घसरण झाली आहे. तर आर्थिक वर्ष 2023-24 मधील पहिल्या तिमाहीत जॉकीचे एकूण महसूल 28% आणि एकूण वृद्धी 31% पर्यंत झाली आहे. मागील काही वार्षिक आधारावर विचार करता अंडरवेअर खरेदीत मामूली घसरण दिसून येते. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत महसूलात 7.5% तर क्वांटिटीत 11.5% घसरण आली आहे.
पैसाच उरत नाही
सध्या भारतात महागाईने कळस गाठला आहे. भाजीपाला, डाळी, साखर, गव्हापासून तांदळापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे किचनवरील बजेट वाढले आहे. महागाईमुळे घर खर्च भागविण्यातच लोकांचा पैसा खर्च होत आहे. ऑनलाईन शॉपिंगवर मोठ्या प्रमाणात सवलत मिळत असल्याने नागरिकांनी तिकडे मोर्चा वळवला आहे.
या कंपन्यांच्या विक्रीत घट
डिसेंबर 2022 मधील शेवटच्या तिमाहीत जॉकी आणि लक्स इंडस्ट्रीजची पॅरेंट कंपनी पेज इंडस्ट्रीजच्या (Page Industries) विक्रीत कमी दिसून आली. रुपा कंपनीत 52 टक्के घसरणीची चर्चा आहे. गेल्या दीड वर्षात रुपाचा शेअर 52 टक्क्यांनी घसरला आहे. पेज इंडस्ट्रीजच्या वॉल्यूममध्ये 11 टक्के तर शेअरच्या भावात 5 टक्के घसरण आली.
किती मोठे आहे मार्केट
यूरोमॉनिटर इंटरनॅशनलनुसार, भारतामध्ये इनरवेयरचे मार्केट 5.8 अब्ज डॉलर वा 48,123 कोटी इतके असल्याचा अंदाज आहे. पुरुष आणि महिला श्रेणीत इनरवेअरची टक्केवारी अनुक्रमे 39% आणि 61% आहे. पण सध्या विक्रीत घट होत असल्याने कंपन्या चिंतेत आहेत.
मंदीचा काढता येतो माग
मंदीचा फेरा येण्याचे काही संकेत मानले जातात. त्यात लिपस्टिक (Lipstick)आणि अंडरवेअर (Underwear) यावरुन मंदीचा माग काढता येतो, मंदीच्या काळात लिपस्टिकची अधिक विक्री होते. लिओनार्ड लॉडर या तज्ज्ञाने हा सिद्धांत शोधला आहे. तर अंडरवेअरची विक्री घटते. 1970 च्या दशकात एलन ग्रीनस्पॅन यांनी या इंडेक्सचा शोध लावला होता.