स्वित्झर्लंडची दिग्गज कंपनी नेस्ले पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकली आहे. 2015 मध्ये कंपनीचे उत्पादन मॅगी वादात अडकले होते. पब्लिक आय या वेबसाईटने केलेल्या खुलाशानंतर स्वित्झर्लंडची ही कंपनी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या कंपनीचे भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या दोन उत्पादनात साखरेचे अधिक प्रमाण आढळले आहे. पण युरोप, जर्मनी, ब्रिटनमधील याच प्रोडक्टमध्ये साखरेचे प्रमाण आढळत नाही. या वादामुळे भारतीय मुलांबाबतच कंपनीने असे धोरण का राबवले असा सवाल विचारण्यात येत आहे. विकसीत आणि विकसनशील देशातील हा भेदभाव खटकणाराच नाही तर मुलांच्या आरोग्याशी कंपनी खेळत असल्याचे समोर येत आहे. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. गुरुवारी व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 3.5 टक्क्यांनी घसरला.
लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ
नेस्ले हा जगातील नावाजलेले ब्रँड आहे. या कंपनीचे उत्पादनं भारतातच नाही तर जगात विक्री होतात. पण कंपनीच्या काही धोरणांचा आणि उत्पादनांचा आधार घेत कंपनी भारतातील लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. लहान मुलांच दूध आणि सेरेलॅक सारख्या प्रोडक्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त साखर असणे हे लठ्ठपणाला आणि इतर आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे यामुळे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काय आहे दावा
स्वित्झर्लंडची कंपनी पब्लिक आयने नेस्लेच्या उत्पादनाची तपासणी केली. यामध्ये कंपनी गरीब देशातील लहान मुलांच्या उत्पादनात जास्त साखर वापरत असल्याचा दावा पब्लिक आयने केलेला आहे. पण विकसीत देशांतील मुलांच्या उत्पादनात साखरेची मात्रा नसते, असे पब्लिक आयचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यांच्या प्रोडक्ट्सच्या माहितीपत्रकावर जीवनसत्वे आणि खनिजांची माहिती देते. पण साखरेचा यामध्ये उल्लेख नसतो.
भारत मोठी बाजारपेठ
भारतात नेस्लेची उत्पादनं लोकप्रिय आहे. आया या उत्पादनावर डोळे झाकून विश्वास टाकतात. आकड्यांनुसार, 2022 मध्ये नेस्ले कंपनीने भारतात 20,000 कोटींचे उत्पादन विक्री केले. दाव्यानुसार, भारतातील बेबी प्रोडक्ट्समध्ये अंदाजे 3 ग्रॅम साखरेचा वापर करते. तर युरोपातील देशांमधील लहान मुलांच्या उत्पादनात साखरेचा दाणा सुद्धा नसतो. WHO च्या माहितीनुसार, लहान मुलांमधील उत्पादनात जास्त साखरेचे प्रमाण घातक ठरु शकते.
शेअरमध्ये झाली घसरण
पब्लिक आयच्या या अहवालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. गुरुवारी बाजार उघडताच नेस्लेचा शेअर 3 टक्क्यांनी घसरला. नेस्ले इंडियाचा शेअर दुपारी 2:18 मिनिटांना 83.30 टक्क्यांच्या घसरणीसह 2,462.85 रुपयांवर व्यापार करत होता. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांचा परतावा दिला आहे.