नवी दिल्ली : देशात गव्हाच्या किंमती (Wheat Price Hike) बेभाव वाढत आहे. गेल्या वर्षीपासून गव्हाच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत. गव्हाच्या किंमती आणि पीठाचे भाव कमालीचे वाढले आहेत. 18 ते 22 रुपयादरम्यान असणारे दर गेल्या वर्षी 33 रुपयांच्या पुढे गेले होते. यंदा पुन्हा गव्हाचे भाव सर्वसामान्यांना रडवणार असल्याचे चित्र आहे. कारण गव्हाचे दर गगनाला भिडले आहेत. चांगल्या दर्जाच्या गव्हाच्या किंमती यंदा नवीन रेकॉर्ड (New Record) करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वर्षभर डाळधान्याचा साठा करण्यासाठी सर्वसामान्यांना खिसा अधिक खाली करावा लागणार आहे.
महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आताच गव्हाची किंमत 3000 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या किंमती 3300 ते 3500 रुपये प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे.
रोलर फ्लोअर मिल्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (RFMFI) अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी किंमती भडकण्यामागचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, खुल्या बाजारात सध्या अजिबात गहू नाही. पूर्व भारतातही गव्हाचे उत्पादन कमी आहे. त्याच परिणाम दिसून येत आहे.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील गव्हाचे वाटप बंद केल्यापासून खुल्या बाजारात गव्हाची मागणी वाढली आहे. इतर घटकांचाही परिणाम मागणीवर होत आहे. केंद्र सरकारने गव्हाच्या किंमतीत हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. गव्हाचे भाव कमी करण्याची मागणी होत आहे.
उत्तरेतील राज्यात गव्हाचा तुटवडा जाणवत आहे. काही व्यापाऱ्यांनी दावा केला आहे की, गव्हाचा सर्वात मोठे उत्पादक राज्य उत्तरप्रदेशचं यंदा गुजरातकडून गव्हाची खरेदी करत आहे. व्यापाऱ्यांच्या मते सध्या उत्तर प्रदेशात गव्हाच्या किंमती 3050 रुपये प्रति क्विंटलवर पोहचल्या आहेत.
राजस्थानमध्ये गव्हाच्या किंमती 2800 रुपये प्रति क्विंटलवर आहेत. गव्हाच्या मिलला आणि सर्वसामान्यांना वाहतूक खर्च सहन करावा लागत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार, यंदा 8 जानेवारी 2023 रोजी गव्हाचा भाव 2788 रुपये प्रति क्विंटलवर पोहचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत भावात जवळपास 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात गव्हाच्या किंमती जवळपास 31.17 रुपये प्रति किलो आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या किंमती 15.76 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर गव्हाचे पीठ 37.03 रुपये प्रति किलो विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा भाव 18.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने वेळीच किंमतीत हस्तक्षेप केला नाही तर चांगल्या दर्जाच्या गव्हासाठी नागरिकांना मोठी किंमती मोजावी लागण्याची शक्यता आहे. या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतील आणि त्यासाठी त्यांना खिसा खाली करावा लागणार आहे.