नवी दिल्ली : कार अथवा दुचाकीचा विमा (Insurance) घ्यायचा असेल तर त्यासाठी मध्यस्थाचा उपयोग करु नका. आता ऑनलाईन पद्धतीने (Online) तुम्हाला सहज विमा खरेदी करता येतो. त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म (Platforms) ही उपलब्ध आहेत. त्यामुळे चांगल्या डिल्समधून तुम्हाला स्वस्तात आणि बेस्ट इन्शुरन्स मिळतो.
नवीन कार खरेदी करताना शक्यतोवर डिलर तुम्हाला कारचा इन्शुरन्स एकतर फ्री देण्याचे आमिष दाखवितो अथवा तो स्वस्तात देण्याची ऑफर देतो. अशावेळी आपण जास्त विचार करत नाही.
मोफत अथवा सवलतीत मिळणाऱ्या इन्शुरन्सचा कालावधी फार तर एक वर्ष अथवा दोन वर्षांचा असतो. त्यामुळे तुम्हाला त्यानंतर विमा खरेदी करण्यासाठी डिलर्सकडूनच फोन येतो. तुम्हाला डिलर्सकडून विमा खरेदी करायचा की स्वतंत्र खरेदी करायचा हा निर्णय तुम्ही घेऊ शकता.
विमा कंपनीकडून थेट विमा खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण फसगत होण्याची भीती असते. तुम्ही विमा पॉलिसी खरेदी करताना, त्या पॉलिसीत कोण-कोणत्या गोष्टींना संरक्षण मिळणार आहे, याची संपूर्ण खात्री करणे आवश्यक असते.
बऱ्याचदा गेल्या वर्षीच्या विम्यात तुम्ही गाडीचे कोणतेही काम काढले नसेल तर तुम्हाला चांगली सवलत मिळते. त्यामुळे पॉलिसीचे पैसे वाचतात. त्याची माहिती करुन घेणे आवश्यक असते. नाहीतर जास्तीची रक्कम तुम्हाला मोजावी लागू शकते.
कोण-कोणत्या पार्टसाठी, कशाप्रकारे विमातंर्गत फायदा मिळतो, याची माहिती करुन घ्या. किती रक्कम मिळते याची खात्री करा, अॅड ऑन सेवेद्वारे तुम्हाला अतिरिक्त फायदा घेता येतो. अॅड ऑनद्वारे, इंजिन प्रोटेक्शन, रोडसाईड असिस्टेंट आदी सेवा मिळविता येऊ शकतात.