नवी दिल्ली : अवघ्या दोन-अडीच वर्षात सोने-चांदींच्या किंमतींनी जोरदार उसळी मारली आहे. मार्च 2020 मध्ये सोन्याचा भाव 35 ते 38 हजार प्रति 10 ग्रॅम दरम्यान होता. पण ऑगस्ट महिन्यात सोन्याने हनुमान उडी मारली. सोन्याचा भाव (Gold Price) 56 हजार रुपयांच्या पुढे पोहचला. म्हणजे अवघ्या पाच महिन्यांतच सोन्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 18 हजार रुपयांचा फायदा झाला. कोरोनामुळे (Corona) गुंतवणूकदार (Investors) सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत होते. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली. सोन्याची मागणी वाढली आणि भाव गगनाला भिडले. आताही तशीच परिस्थिती आहे. सोन्याचा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये कोविडची चौथी लाट (Fourth Wave of China Covid) आल्याचे समोर आले आहे. संसर्गाची आकडेवारी भयावह आहे. त्यामानाने भारतातील परिस्थिती चिंताजनक नाही. पण याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर नक्की होणार आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येत्या काही महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमती लांब उडी मारणार आहे.
नवीन वर्षांत, 2023 मध्ये जानेवारी ते मार्च महिना सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाचा राहणार आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात सोने जवळपास 1600 रुपये तर मार्च महिन्यात 3000 रुपयांनी उसळी घेईल. सोने अडीच वर्षानंतर नवीन रेकॉर्ड तयार करु शकते.
कोविडच्या नवीन व्हेरिंएटचा प्रभाव जगभरात दिसत आहे. त्याचा परिणाम भारतावर कसा असेल याचा अंदाज आताच वर्तवणे अवघड आहे. पण नव्या घडामोडींचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातही गुंतवणूकदार सजग झाले आहेत. काही गुंतवणूकदार बाजारातून पैसा काढून तो सोने-चांदीत गुंतवणूक करत आहेत.
एवढेच नाही तर दुसरीकडे नवीन वर्षात आर्थिक मंदीची आशंका व्यक्त करण्यात येत आहे. युरोपियन संघातील देशांसह अमेरिकन केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्याचा सपाटा सुरु केला आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी या बँकांनी आक्रमक धोरण आखले आहे. विकसीत राष्ट्रांवर मंदीचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यात कोविड आणि मंदीचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीवर दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीत 1,643 रुपये प्रति 10 ग्रॅम फायदा झाला. तर 30 नोव्हेंबर रोजी वायदे बाजारात सोन्याचा भाव 52,931 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, हा भाव डिसेंबर महिन्यात 54,574 रुपयांवर पोहचला.
चांदीतील गुंतवणूकदारांचीही चांदी झाली. त्यांना मोठा फायदा झाला. 30 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 63,461 रुपये प्रति किलोग्रॅम होता. 23 डिसेंबर रोजी चांदीची किंमत 69,033 रुपये प्रति किलोग्रॅम होता. डिसेंबरमध्ये गुंतवणूकदारांना एका किलोमागे 5,572 रुपयांचा फायदा झाला.
26 सप्टेंबर रोजी चांदीचा दर प्रति किलो 56,440 रुपये होता. 3 महिन्यांत चांदीने गुंतवणूकदारांना किलोमागे 12,593 रुपयांचा फायदा मिळवून दिला. तज्ज्ञांच्या मते, मार्च महिन्यात सोन्याचा भाव 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा दर 81 हजार रुपये प्रति किलोग्रॅम होईल.