नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करणार हे दिवास्वप्नच ठरत आहे. गेल्या दीड वर्षांत जनतेला या बातम्या वाचूनच दिलासा करुन घ्यावा लागत आहे. कारण या दीड वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एक रुपया सुद्धा कमी केलेला नाही. दरवाढ करुन हा निर्णय जणू लॉक करण्यात आला आहे. उलट जागतिक बाजारात क्रूड ऑईल महाग असतानाही देशातील जनतेला कमी किंमतीत इंधन पुरवठा होत असल्याची शाबसकी केंद्राने मिळवली. आता पुन्हा पेट्रोल स्वस्ताईची आवई उठली आहे. त्यामागील कारण तरी काय?
निवडणुका आल्या तोंडावर
मोदी सरकार येण्यापूर्वी काँग्रेसच्या काळात इंधन किंमतीत वाढ झाल्यावर तत्कालीन विरोधी पक्ष आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी देश डोक्यावर घेतला होता. पण भाजप सत्तेत आल्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याऐवजी त्यांनी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जनतेने मोठा रोष व्यक्त केल्यानंतर गेल्या दीड वर्षांत इंधनाचे भाव स्थिर आहेत. एकदाच हे भाव उच्चांकावर पोहचल्यावर जणू ते लॉक करण्यात आले आहेत. आता लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने पेट्रोलमध्ये 10 रुपये स्वस्ताईचा दावा करण्यात येत आहे.
10 रुपयांपर्यंत होईल स्वस्त
एचटीच्या एका वृत्तानुसार, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना या पूर्वी मोठा तोटा सहन करावा लागला होता. केंद्र सरकारने त्यांना काही हजार कोटींचे अनुदान दिले होते. त्यानंतर या कंपन्या आता फायद्यात आहेत. त्यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत नफा कमावला. जागतिक बाजारात पण कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा करण्यात येत आहे. आता दाव्यानुसार दिलासा मिळेल की पुन्हा ही एक अफवा असेल हे लवकरच समोर येईल.