UPI ATM Payment News | युपीआय पेमेंटने (UPI Payment) व्यवहाराच्या जगात खऱ्या अर्थाने क्रांती आणली आहे. युपीआयने बँकिंग क्षेत्रासह व्यवहारात ही गतिमानता आणली आहे. अवघ्या काही सेकंदात तुम्हाला रक्कम वळती करता येते, बिल अदा करता येते, रक्कम अदा करता येते, विमा खरेदी करता येतो, गॅस बुकिंग करता येते आणिक काय, काय करता येते. तेही एकाच अॅपवर. आता एवढ्यावरच ही प्रक्रिया थांबलेली नाही. तर तुम्हाला एटीएममधूनही (ATM)डेबिट कार्डचा वापर न करता सहजपणे रक्कम काढता येणार आहे. कार्डलेस सेवा ही युपीआयद्वारे शक्य झाली आहे. त्यासाठी तुमचे युपीआय पेमेंट अॅप उपयोगी पडणार आहे. देशातील काही ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून एटीएममधून रक्कम काढता येते. आता ही सोय देशातील सर्वच एटीएममध्ये लवकरच सुरु करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयीचे दिशानिर्देश दिले आहेत. त्यामुळे विना डेबिट कार्ड आता बिनधास्त एटीएममधून रक्कम काढता येईल. त्यासाठी ना कार्ड वापरावे लागणार ना एटीएमच्या बटनांची फार आकडेमोड करावी लागणार ना पिन टाकावा लागणार एटीएम स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅन (Scan QR Code) करुन रक्कम काढता येईल. पण ही सुविधा सशुल्क असेल की नि:शुल्क, माहिती जाणून घेऊयात
इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (Interoperable Cordless Cash Withdrawal- ICCW) असे या नवीन सुविधेला नाव देण्यात आले आहे. RBI ने सर्व बँकांना त्यांच्या ATM मध्ये ICCW सुविधा लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI शी संबंधित एक नवीन सुविधा विकसित केली आहे. एटीएम मशिनमध्ये कार्डलेस कॅश विथड्रॉवल इन्स्टॉल झाल्यानंतर, तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe आणि इतर UPI अॅप्सद्वारे पैसे काढू शकता. यासाठी केवळ तुमचा मोबाईल तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे. एटीएममधील फसवणूक रोखण्यासाठी ही नवीन सेवा उपयुक्त ठरेल असा दावा करण्यात येत आहे.
यूपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाईल याविषयी अद्याप तरी काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की कोणतीही बँक UPI मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारू शकत नाही. कार्डलेस सुविधा एटीएम, डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्यासारखीच असेल. यूपीआय वापरून एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये आता यापुढे कार्ड घेऊन जाण्याची आवश्यकता पडणार नाही. नवीन बदलानंतर एटीएमच्या मशीनच्या स्क्रीनवर QR कोड दिसेल, जो फोनद्वारे स्कॅन केला जाईल आणि तुम्ही पैसे काढू शकाल.