मुंबई : ‘येस बँके’च्या खातेधारकांवरील निर्बंध आजपासून हटवण्यात येणार आहेत. संध्याकाळी सहा वाजल्यापासून ‘येस बँक’ संपूर्ण बँकिंग सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे खातेधारकांना 50 हजार रुपयांवरील रक्कमही काढता येणार आहे. (Yes Bank resume banking)
पाच मार्च रोजी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) येस बँकेवर निर्बंध आणत 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मज्जाव केला होता.
आतापर्यंत केवळ एक तृतीयांश ग्राहकांनी 50 हजार रुपये काढले आहेत. ‘येस बँके’च्या सर्व सेवा बुधवारी सुरु होतील, अशी माहिती बँकेने पत्रकार परिषद घेऊन दिली. सर्व एटीएममध्ये पुरेशी रोकड असून ग्राहकांना घाबरुन जाण्याची गरज नाही, अशा शब्दात ‘येस बँके’ने आश्वस्त केलं.
Yes Bank to resume full banking services from 6 pm, today. Reserve Bank of India (RBI) had imposed moratorium on the bank & capped withdrawals at Rs 50,000, on 5th March. pic.twitter.com/OBXIz3XXqp
— ANI (@ANI) March 18, 2020
एसबीआय पुढील तीन वर्षापर्यंत बँकेचा एकही हिस्सा विकणार नाही. एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS), आयएमपीएस (IMPS) या सेवा बुधवारपासून सुरु होणार आहेत. आठ बँकांची गुंतवणूक या येस बँकेची ताकद दाखवते, असं ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले. (Yes Bank resume banking)
एसबीआय व्यतिरिक्त इतर बँकांनी येस बँकेत 10,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. बुधवारी संध्याकाळी सर्व प्रकारच्या स्थगिती बँकेकडून हटवल्या जातील, असं ‘येस बँके’च्या नव्याने स्थापन झालेल्या मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.
आपण देशभरातील आमच्या 1,132 शाखांमध्ये कुठेही जाऊन 19 मार्चपासून बँकिंग व्यवहार करु शकता, असंही बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.
आर्थिक संकटात सापडल्यामुळे येस बँकेला रिझर्व्ह बँकेने 30 दिवसांची तात्पुरती स्थगिती दिली होती. 3 एप्रिलपर्यंत ग्राहकांना 50 हजारापर्यंत रक्कम काढण्याची मुभा होती
काय होते निर्बंध?
कुठल्याही खातेधारकाला बचत, चालू किंवा इतर कुठल्याही खात्यातून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नव्हती. जरी बँकेत एका खातेधारकाची एकापेक्षा जास्त खाती असली, तरी बँकेतून एकूण 50 हजाराची रक्कमच काढू शकता, अशी माहिती आरबीआयकडून जारी करण्यात आली होती. (Yes Bank resume banking)