केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात जोरदार किस्सा सांगितला. दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे प्रमुख धीरूभाई अंबानी यांनी त्यावेळी त्यांच्या एका कृतीवर खूष होऊन कशी कौतुकाची थाप दिली, याची माहिती त्यांनी दिली. तुम्ही तर माझ्यापेक्षा पण हुशार आहात, असे गौरवोद्गार धीरुभाईंनी काढल्याची आठवण गडकरी यांनी सांगितली.
शेअर बाजारातून जमवले 1200 कोटी
मला व्यवसायाची चांगली माहिती आहे, असे गडकरी म्हणाले. माझी इच्छा शक्ती दांडगी होती. त्यावेळी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सरकार बाँड 7 दिवसात नाही तर 7 तासांत 7 वेळा सब्सक्राईब झाला होता. त्यावेळी वरळी उड्डाणपुलासाठी सरकारला निधीची गरज होती. त्यावेळी आपण बाजारातून 1200 कोटी रुपये जमा केले. इतक्या प्रमाणात सरकारी कामासाठी रक्कम जमा केल्याने धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा एकदम प्रभावित झाले. तेव्हा धीरुभाई यांनी तुम्ही तर आमच्यापेक्षा हुशार आहात, अशी कौतुकाची थाप दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात त्यांनी हा किस्सा सांगितला.
खड्डेमुक्त रस्त्याचे दाखवले स्वप्न
देशातील अनेक मोठ्या रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्डे रस्त्यात आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत, हेच यामुळे कळत नाही. पण अनेक द्रुतगती, गतिमान रस्त्यांचे जाळे ही काही वर्षांत देशभरात तयार झाले आहे. गडकरी यांनी नेमका हाच धागा पकडला. तुम्ही बदल होतोय हे तरी मान्य कराल की नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. पाऊस आला की खड्डे येतात. मुसळधार पावसामुळे रस्त्याची चाळण होते. रस्त्यात खड्डे होऊ नये ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही एक नवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहोत. त्यामुळे महामार्ग आणि इतर रस्त्यांवर खड्डे होणार नाहीत. या तंत्रज्ञानातंर्गत आठ इंचापर्यंत काँक्रीट टाकण्यात येईल. त्यामुळे रस्त्यात खड्डे होणार नाहीत, असा दावा गडकरी यांनी केला.
2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र
भारताला जगातील तिसरी अर्थसत्ता करणे यासाठी आम्ही चांगले काम केले आहे. गेल्या 60 वर्षांत जो विकासाचा पल्ला आपल्याला गाठता आला नाही तो 10 वर्षांतच आम्ही गाठला. 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र होईल, हा मला विश्वास असल्याचे गडकरी म्हणाले.