Unemployment | भारत(Bharat, India) दोन विरुद्ध प्रवाहावर स्वार झालेला आहे. एकीकडे झपाट्याने अर्थव्यवस्था (Economy) पूर्वस्थितीत येत आहे. त्याचवेळी अर्थव्यवस्थेसमोर मंदी, बेरोजगारी (Unemployment), उद्योगाचं पलायन, कर्ज दरातील वाढ अशा एक ना अनेक संकटांची मालिका ठामपणे उभी ठाकली आहे. बेरोजगारीच्या आघाडीवर अद्यापही मोठा उपाय सापडलेला नाही. पूर्वीपासूनच रोजगार निर्मितीत म्हणावी तशी प्रगती साधता आली नाही. ज्या स्टार्टअपचे (Startup)आपण गोडवे गात आहोत. त्यांच्या धरसोड वृत्तीने सुशिक्षित आणि कुशल कामगारांची चेष्टा सुरु आहे. दोन-तीन महिने हे स्टार्टअप नोकऱ्या देतात आणि कुठलेही ठोस कारण न देता तरुणांना कामावरुन कमी करत आहेत. तर ग्रामीण भागात कमी पाऊस, अतिवृष्टीने जगण्याच्याच प्रश्नाने आ वासला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात यंदा बेरोजगारीचे प्रमाण जलदगतीने वाढले आहे. एकीकडे जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेने पाचवे स्थान पटकावले आहे. पण बेरोजगारीच्या आघाडीवर सरकारला अधिक उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यात 8.3 टक्क्यांवर आहे. बेरोजगारी दर एका वर्षातील उच्चांकावर आहे. मागील महिन्याच्या तुलनेत 20 लाखांनी रोजगार घटले. आता 39.46 कोटी रोजगार आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 6.8 टक्के होता आणि रोजगार 397 दशलक्ष इतका होता. सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी पीटीआयला (PTI) सांगितले की, “शहरी बेरोजगारीचा दर सामान्यतः ग्रामीण बेरोजगारीच्या दरापेक्षा जास्त आहे, यंदा शहरी बेरोजगारीचे प्रमाण 8 टक्के, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर सुमारे 7 टक्के आहे.”
ऑगस्टमध्ये, शहरी बेरोजगारीचा दर 9.6 टक्क्यांवर गेला आणि ग्रामीण बेरोजगारीचा दर 7.7 टक्क्यांवर गेला आहे . अनियमित पावसामुळे पेरण्यांवर परिणाम झाला. परिणामी ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढले, असे व्यास यांनी निदर्शनास आणून दिले. देशातील ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जुलैमध्ये 6.1 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 7.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे रोजगार दर 37.6 टक्क्यांवरून 37.3 टक्क्यांवर घसरला.
पावसाने काही भागात उशीरा पण दमदार खेळी खेळल्याने येत्या काही दिवसात ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण घटण्याचा विश्वास व्यास यांनी व्यक्त केला. पावसाने उशीरा का असेना हजेरी लावली. त्यामुळे कृषी कामांना गती येईल आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळतील असे मत त्यांनी व्यक्त केले. परंतु,शहरी भागात येत्या काही दिवसात बेरोजगारीचे प्रमाण कितपत घसरले याविषयी अताच सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.
आकडेवारीनुसार, हरियाणात ऑगस्टमध्ये सर्वाधिक 37.3 टक्के बेरोजगारी होती. यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये बेरोजगारीचा दर 32.8 टक्के, राजस्थानमध्ये 31.4 टक्के, झारखंडमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 17.3 टक्के आणि त्रिपुरामध्ये 16.3 टक्के होता. या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये सर्वात कमी 0.4 टक्के, मेघालयात 2 टक्के, महाराष्ट्रात 2.2 टक्के आणि गुजरात आणि ओडिशामध्ये 2.6 टक्के बेरोजगारी दर होता.