नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आनंदवार्ता आणली आहे. कंपनीचा तिमाही निकाल (Zomato Q1 Result) समोर आला आहे. त्यात कंपनीने मोठी घौडदोड केली आहे. जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 2 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला. एक वर्षापूर्वी या कंपनीला 186 कोटींचा तोटा झाला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीला 189 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. कंपनीकडे उलाढालीसाठी 2416 कोटी रुपयांचे भांडवल उरले होते. एका वर्षांपूर्वी याच तिमाहीत 1414 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा यंदा हे प्रमाण 71 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शेअर बाजारात पण कंपनीचा शेअर वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.
शेअरमध्ये उसळी
झोमॅटोचा निकाल शेअर बाजार बंद होण्यापूर्वी समोर आला. कंपनीचा शेअर (Zomato Share Price) गुरुवारी बीएसईवर 1.55 टक्के वा 1.32 रुपयांनी वधारला. शेअर 86.22 रुपयांवर बंद झाला. कंपनीने एक्सचेंज फाईलिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे जून 2023 मध्ये क्विक कॉमर्समध्ये कंपनीने सकारात्मक योगदान दिले.
तोट्यातून नफ्याचे गणित
कंपनीचा एबिटडा 12 कोटी रुपये आहे. एक वर्षापूर्वी कंपनीला याच कालावधीत 152 कोटी रुपायांचा तोटा झाला होता. कंपनीचा एडजस्टेड एबिटडा मार्जिन 0.4 टक्के राहिला. क्विक कॉमर्स व्यवसाय वगळता एडजस्टेड रेव्हेन्यू 2402 कोटी रुपये आहे. एका वर्षांत कंपनीने 33 टक्के वृद्धी नोंदवली.
व्यवसायात लाभ
पहिल्या तिमाहीच्या यशाबद्दल सीईओ दीपिंदर गोयल यांनी आनंद व्यक्त केला. योग्य ठिकाणी माणसांची निवड, मेहनत या बळावर हा पल्ला गाठल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसायातील वृद्धी कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
2021 मध्ये आला होता आयपीओ
झोमॅटो कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये बाजारात आला होता. या आयपीओची इश्यू प्राईस 76 रुपये होती. कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक 163 रुपये आहे. सध्या या शेअरमध्ये तेजी दिसत असली तरी हा शेअर त्याच्या उच्चांकी कामगिरीपेक्षा 47 टक्के घसरणीवर आहे.
अनेकांना धक्का
ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने जून तिमाहीत 2 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कंपनीचा महसूल जून महिन्यात वार्षिक आधारावर 70.9 टक्क्यांनी वाढला. हा नफा 2,416 कोटी रुपयांवर पोहचला. झोमॅटोने 3 ऑगस्ट रोजी जून तिमाहीच्या निकालाची माहिती दिली.
कर्मचाऱ्यांवर गंडातर
कंपनीने अनेक बदल केले. अनेक कर्मचारी कमी केले. बदलाचा फटका अनेक कंपन्यांना बसला. त्यामुळे स्टार्टअपविषयी गुंतवणूकदारांच्या मनात भीती वाढली होती. तोट्यात असलेली झोमॅटो पुन्हा मैदानात आली आहे. झोमॅटोने कमबॅक केले आहे. मोठा परिणाम दिसून आला. शेअर बाजारात झोमॅटोचा शेअर वधारल्याने गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला.