एअर इंडीयात मोठी भरती, टाटा ग्रुपच्या एअरलाईन्स कंपनीत एवढी पदे भरली जाणार

| Updated on: Feb 25, 2023 | 8:09 AM

टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. आता कंपनीने मोठ्या नोकर भरतीची योजना आखली आहे.

एअर इंडीयात मोठी भरती, टाटा ग्रुपच्या एअरलाईन्स कंपनीत एवढी पदे भरली जाणार
AIR-INDIA-TATA
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : टाटा कंपनीने एअर इंडीया कंपनी सरकारकडून पुन्हा ताब्यात घेतल्याने कंपनीचा पूर्ण कायापालट केला जात आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या ताफ्याचा आणि ऑपरेशन्सचा विस्तार करण्याची योजना आखली आहे . या पार्श्वभूमीवर कंपनीने यावर्षी 4,200 क्रू मेंबर्स ( केबिन क्रू ) आणि 900 पायलटची भरती करणार आहे. म्हणजेच, एअरलाइन्स 5100 पायलट, क्रू मेंबर्सची भरती करणार आहेत. विमान कंपनीने काही दिवसांपूर्वी बोईंग आणि एअरबसकडून 470 विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. यामध्ये 70 मोठ्या विमानांचाही समावेश आहे.

टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते. कंपनीने 36 विमाने भाड्याने देण्याची योजना आखली आहे. यापैकी दोन B777-200 LR विमाने कंपनीने आधीच आपल्या ताफ्यात सामील केली आहेत. एअर इंडिया कंपनीने शुक्रवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात 2023 मध्ये 4,200 प्रशिक्षणार्थी क्रू मेंबर्स आणि 900 पायलट भरती करण्याची योजना असल्याचे म्हटले आहे.  कंपनीच्या ताफ्यात नवीन विमाने आणली जात आहेत, कंपनीचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाज वेगाने विस्तारत आहे, म्हणूनच ही नवीन भरती केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एअर इंडीया कंपनीने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 1,900 क्रू मेंबर्सची भरती केली आहे. “गेल्या सात महिन्यांत (जुलै 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत) सुमारे 1,100 क्रू मेंबर्सना प्रशिक्षण देण्यात आले आणि तीन महिन्यांत सुमारे 500 क्रू मेंबर्सना उड्डाणासाठी सज्ज करण्यात आले,” असे पत्रकात मध्ये म्हटले आहे.

6,500 हून अधिक पायलटची गरज

एअर इंडिया एअरबस आणि बोईंगकडून खरेदी करणार असलेल्या 470 विमानांना चालवण्यासाठी येत्या काही वर्षांत ६,५०० हून अधिक पायलटची गरज भासणार आहे. विमान कंपनीने आपल्या ताफ्याचा तसेच ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी एकूण 840 विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये 370 विमानांची थेट खरेदी करण्याती योजना आहे.

आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर

आतापर्यंत एखाद्या विमान कंपनीने विमाने खरेदी करण्यासाठी दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर मानली जात आहे. एअर इंडियाकडे सध्या 113 विमानांचा ताफा ऑपरेट करण्यासाठी सुमारे 1,600 वैमानिक आहेत. अलीकडच्या काही दिवसांत क्रूच्या कमतरतेमुळे उड्डाणे रद्द किंवा विलंब होत असल्याच्या बातम्या येत होत्या. कंपनीच्या दोन उपकंपन्या एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडिया यांच्याकडे 54 विमाने उडवण्यासाठी सुमारे 850 वैमानिक आहेत.