भरघोस पगाराची नोकरी करण्याची, जास्तीत जास्त पैसा कमावण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. काहींना तर आखाती देशात जाऊन पैसा कमावण्याची इच्छा निर्माण होते. त्यातही दुबई सारख्या ठिकाणी जाऊन पैसा कमवावा असं सर्वांना वाटतं. कारण त्यांच्या परिचयाचे कोणी ना कोणी तरी दुबईला जाऊन आलेला असतो. त्याने भरपूर पैसा कमावलेला असतो. त्यामुळे त्याचं पाहून इतरांनाही दुबईत जाऊन पडेल ते काम करून पैसा कमावण्याची इच्छा होते. दुबईत चिक्कार नोकऱ्या आहेत. हेल्परपासून मजुरापर्यंत आणि बड्या पोस्टपर्यंत… सर्वच श्रेणीतील नोकऱ्या आहेत. पण दुबईत काम करणाऱ्यांचा पगार किती आहे माहीत आहे का? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दुबईतही क्लिनिंग, फूड पॅकिंग, सामान उचलणं, मसाला बनवणं, स्वंयपाक्या आदी कामे आहेत. मजुरीपासून पॅकिंगपर्यंतच्या कामाला माणसांची गरज असते. कामगार मिळत नसल्याने परदेशातून आलेल्या कामगारांना दुबईत काम दिलं जातं. त्यासाठी चांगला पैसाही मोजला जातो. तुम्ही कमी शिकलेला असाल आणि कामचलाऊ इंग्रजी बोलत असाल तर काम करण्यासाठी दुबई तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. कारण दुबईत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ येथून गेलेले कामगारच अधिक आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्पर म्हणून तुमची सॅलरी भारताच्या तुलनेत दुबईमध्ये दोन ते तीन पट जास्त असते.
दुबईमध्ये एका सामान्य मजुराचा पगार साधारणपणे 900 ते 1000 दिरहम असते, जे भारतीय चलनानुसार साधारण 20,000 ते 23,000 रुपये होते. ही बेसिक सॅलरी आहे. जर तुम्ही कंपनीत ओव्हरटाइम काम केलात, तर तुम्हाला साधारणतः 1100 ते 1200 दिरहम मिळू शकतात. म्हणजे रुपयाच्या भाषेत सांगायचे तर 25,000 ते 27,000 रुपये असतात.
दुबईमध्ये पॅकिंगचं काम खूप कमी आहे, कारण इथे ऑटोमेटेड मशीनचा वापर होतो. त्याद्वारेच प्रोडक्ट्स पॅक केलं जातं. तरीही, जर तुम्हाला पॅकिंगसारख्या कामांमध्ये नोकरी करायची असेल, तर तुम्ही प्रोडक्ट्सला ट्रॉलीद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करू शकता. यासाठी दुबईच्या कंपन्या पॅकिंग सहाय्यकांना साधारणपणे 800 ते 1000 दिरहम पगार मिळतो. म्हणजे भारतीय चलनानुसार 18,000 ते 22,000 रुपये पगार मिळतो.
दुबईमध्ये हाउसकीपरची सॅलरी साधारणपणे 1100 ते 1200 दिरहम दरमहा आहे. भारतीय रुपयात महिन्याला 24,000 ते 26,000 रुपये होतात. तुम्हाला दुबईमध्ये हाउसकीपिंगचं काम करायचं असेल, तर तुम्ही दुबईच्या होटेल्समध्ये नोकरी करू शकता. कारण तिथे तुम्हाला मोफत जेवण, राहण्यासाठी रूम, ट्रान्सपोर्टेशन, मेडिकल फायदे इत्यादी सुविधा दिल्या जातात. मात्र, दुबईमध्ये हाउसकीपिंगचं काम मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1-2 वर्षांचा अनुभव असावा लागतो. कारण ज्यांना हाऊसकिंपिंगचा अनुभव आहे, अशा लोकांनाच होटेल्स प्राधान्य देत असते.
तुम्हाला थोडं-थोडं इंग्रजी बोलता आणि समजता आलं पाहिजे. कारण दुबईमध्ये अरबीसह इंग्रजीही बोलली जाते. मात्र, दुबईमध्ये तुम्हाला भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी आणि इतर देशांचे लोकही मिळतील ज्यांच्याशी हिंदीत संवाद साधता येईल. तुमचं शरीर पूर्णपणे निरोगी असावं, जेणेकरून तुम्ही मेडिकल टेस्ट पास करू शकाल.