अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) उत्तर भारतातील अनेक भागात कडकडीत बंद जरी पाळण्यात आला असला आणि हिंसक प्रदर्शने जरी झाली असली तरी या योजनेची सकारात्मक बाजू ही समोर येत आहे. या योजनेला अनेक बड्या उद्योजकांनी (Industrialist) पाठिंबा दर्शविला आहे. केवळ समर्थन देऊनच उद्योग समुह थांबले नाहीतर या कुशल मनुष्यबळाचा त्यांच्या कंपन्यांना फायदा पोहचावा यासाठी त्यांनी ही योजना अंमलात येण्यापूर्वीच अशा अग्निवीरांना नोकरी देण्याच्या ऑफर्सचा (Job Offers) धडाका लावला आहे. महिंद्रा ग्रुपनंतर (Mahindra Group) आता टाटा सन्स कंपनीने (Tata Sons) आणि इतर बड्या उद्योग समुहांनी अग्निवीरांना त्यांच्या समुहात नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या उद्योजकांनी अग्निपथ योजनेचे तोंडभरून कौतुकही केले आहे. अग्निपथ योजनेतंर्गत तिनही सैन्य दलात भरती प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरु होत आहे. त्यामुळे ही योजना सुरु होण्यापूर्वीच अग्निवीरांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर या योजनेविषयी आणि हिंसक घटनांविषयी भावनांना वाट मोकळी करुन दिली. अग्निपथ योजनेवरुन देशात सुरु असलेल्या हिंसेवरुन दुःखी झाल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे तरुणांना स्वंयशिस्त लागेल आणि त्यांच्यात क्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्याकडे चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर कौशल्य ही असेल, या गोष्टी त्यांना रोजगार प्राप्तीसाठी महत्वाच्या ठरतील असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिंद्रा समुह अशा प्रशिक्षित आणि क्षमताप्राप्त तरुणांना रोजगार देण्यासाठी तयार असून अशा अग्निवीरांचे समुहात स्वागत असल्याचे ट्विट महिंद्रा यांनी केले.आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत, कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांना रोजगाराच्या अनंत आणि अमर्याद संधी असल्याचा विश्वास दिला.
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी अग्निवीरांना त्यांच्या समुहात नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी अग्निपथ योजनेलाही पाठिंबा दिला आहे. अग्निपथ ही तरुणांसाठी देशाच्या संरक्षण दलात सेवा बजावण्याची उत्तम संधी असून अशा तरुणांचे टाटा समुहात स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले.
सैन्य दलात भरतीसाठी तीनही सैन्य दलांनी भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीची तारीखही घोषीत करण्यात आली आहे. आर्मीसाठी 1जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. तर वायुसेनेसाठी भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरु करण्यात येईल.नाविक दलासाठी भरती प्रक्रिया 25 जूनपासून सुरु होत आहे.