पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल पुढच्या आठवड्यात लागणार असला तरी नव्या परिपत्रकामुळं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 12 ऑगस्टला 413 पदांसाठी पसंतीक्रम नोंदवण्याचं आवाहन केलं होतं. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले होते. मात्र, आज नवा आदेश काढत पसंतीक्रम न दिलेल्या विद्यार्थ्यांना पदक्रमांकानुसारचं नियुक्ती मिळणार आहे, असं जाहीर केलंय. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये नव्या आदेशानं संभ्रम निर्माण झाला आहे. आयोगानं परत एकदा पसंतीक्रम मागवावेत अशी मागणी राज्यसेवा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. 10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीनं देण्यात आल्यानंतर आयोगानं निकालाविषयी भूमिका जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी पत्र दिलं होतं. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या 413 पदांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.
कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळं परीक्षा 6 वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुण्यात चक्काजाम आंदोलन केल्यावर एमपीएसीनं 21 मार्चला परीक्षा झाली होती. 200 पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Public Service Commission will declare result of State Service Exam Result in next week