पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून (MVA) एमएपीएससीकडे अतिरिक्त मागणीपत्र देण्यात आल्यानं महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एमपीएससी गट ब अराजपत्रित 2021 सेवा परीक्षेद्वारे आता 1085 पदांची भरती होणार आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक अशी पद या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. एकूण 419 पदांसाठी अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झालं असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विट द्वारे कळवण्यात आलं आहे. या आधी 666 जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता 419 जागा वाढल्यानं 1085 पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. वाढ करण्यात आलेल्या जागांसंबंधीची अधिक माहिती लोकसेवा आयोगाकडून मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर करताना करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021करीता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. एकूण 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल.प्रवर्गनिहाय पदे मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 11, 2022
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021करीता राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. याद्वारे एकूण 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल.प्रवर्गनिहाय पदे मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील, असं लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं आहे. दरम्यान, वाढ करण्यात आलेली पदं ही राज्य कर निरीक्षक संवर्गातील आहेत.
सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदं अशा एकूण 666 पदांसाठी मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता त्यामध्ये राज्य कर निरीक्षक पदाच्या 419 जागांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे राज्य कर निरीक्षक पदाच्या एकूण 609 जागांसाठी ही भरती होईल. तर एकूण भरती प्रक्रिया 1085 पदांसाठी राबवण्यात येईल.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आणि परिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या द्वारे पोलीस सेवेत असणाऱ्या उमदेवारांना 6 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे लांबणीवर
MPSC Declared 419 posts increased in Maharashtra Secondary Service Combined pre exam 2021