मुंबई : भारतीय सैन्य दलासोबत काम करण्याची संधी अनेक तरूण उराशी बाळगून असतात. त्यामुळे कधी एकदा संधी मिळते यासाठी सज्ज असतात. आता अग्निपथ योजनेंतर्गत वर्ष 2023-24 च्या नव्या अग्निवीर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. joinindianarmy.nic.in वर या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. अग्निवीर भरतीसाठी 16 फेब्रुवारीपासून अर्ज दाखल करता येणार आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह इतर राज्यातील तरुणांसाठी वेगवेगळे नोटीफिकेशन जारी केले आहेत.15 मार्च 2023 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समॅन (8वी पास) अशा पदासाठी भरती केली जाणार आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाईदलात सैनिकांची 4 वर्षांसाठी भरती केली जाते. 4 वर्षानंतर 75 टक्के सैनिकांना घरी पाठवलं जाईल. तर उर्वरित 25 टक्के अग्निवीरांना सैन्यदलात कायमस्वरुपी नियुक्ती केली जाईल.अग्निवीर पदासाठीचं वय साडे 17 वर्षे ते 21 वर्षे इतकं आहे.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 250 रुपये भरावे लागतील.
अग्निवीर निवड परीक्षेचं स्वरुप थोडं बदलण्यात आलं आहे. अग्निवीर बनण्यासाठी सर्वप्रथम कॉमन एँट्रांस चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर फिजिकल आणि मेडिकल टेस्ट होईल. फिजिकल टेस्टचमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींनाच वैद्यकीय चाचणीसाठी बोलवलं जाईल
फिजिकल टेस्टमधील पात्रता – उंची कमीत कमी 169 सेमी आणि छाती 5 सेमी फुगवण्यासह 77 सेमी इतकी असावी. काही राज्यांमध्ये उंची 170, 165 आणि 163 इतकी असणार आहे.अग्निवरी क्लर्क आणि स्टोअरकीपर टेक्निकलसाठी उंची 162 सेमी आणि छाती 5 सेमी फुगवण्यासह 77 सेमी असावी.
अग्निवीर पदांसाठी भरती 4 वर्षांसाठी असते. पहिल्या वर्षी 30 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार असा महिना पगार मिळणार आहे. तसेच सेवानिधीसाठी पगारातून 30 टक्के कापले जातील. म्हणजेच पहिल्या वर्षी 21 हजार रुपये हातात पडतील. तर 9 हजार रुपये अग्निवीर सेवा निधी फंडात जमा होतील.म्हणजेच 4 वर्षानंतर 10.4 लाख रुपये जमा होतील. चार वर्ष संपल्यानंतर सेवा निधी पॅकेजमधून 11.71 लाख रुपये हाती पडतील.