नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC परीक्षा आता केवळ हिंदी आणि इंग्रजीत नाही तर आता एकूण 15 भाषेत देता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही माहीती दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रादेशिक भाषांना न्याय मिळणार असून आपल्या मातृभाषेत स्थानिक युवकांना परीक्षा देता येणार असल्याने सर्वांना समान संधी मिळणार आहे. लवकरच सरकार सर्वच 22 स्थानिक भाषांमध्ये ही परीक्षा देण्याची व्यवस्था करणार आहे.
केंद्र सरकारने स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतल्या जाणाऱ्या सरकारी नोकर भरतीची परीक्षा ( SSC ) एकूण 15 भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील युवकांना या नोकर भरती प्रक्रीयेत सामावून घेता येणार आहे असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही घोषणा केली. मनुष्यबळ, लोकतक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीच्या बैठकीला संबोधित करताना जितेंद्र सिंह यांनी वरील ऐतिहासिक घोषणा केली. या निर्णयाने स्थानिक तरुणांना संधी मिळेल आणि प्रादेशिक भाषांना उत्तेजन मिळेल. आता नीट, जेईई आणि सीयूईटी परीक्षेचे आयोजन हिंदी आणि इंग्रजी शिवाय अन्य विभिन्न स्थानिक भाषेत केले जाणार आहे.
एसएससी भरती परीक्षा हिंदी आणि इंग्रजी शिवाय 13 विविध प्रादेशिक भाषात होणार आहेत. त्यात आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मळ्यालम, कन्नड, तामिळ, तेलगु, उडीया, उर्दू, पंजाबी, मणिपूरी आणि कोंकणी भाषेत पेपर सेट केले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ वर्षे अधिकृत भाषा हिंदी शिवाय भारतातील प्रादेशिक भाषांना उत्तेजन देण्याचे काम सुरु असून त्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. प्रादेशिक भाषांना नोकर भरती परीक्षेत स्थान दिल्याने लाखो उमेदवारांना आपल्या मातृभाषेत तसेच प्रादेशिक भाषेत परीक्षा देता येईल तसेच त्यांचा उत्तीर्ण होण्याची शक्यतेत वाढ होईल असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
दक्षिणेतील अनेक राज्यांनी एसएससी नोकर भरती परीक्षा इंग्रजी आणि हिंदी शिवाय अन्य भाषांमध्ये घेतली जावी अशी मागणी केली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे,. कर्मचारी निवड आयोगाने अलिकडे उमेदवारासाठी 15 भाषेत परीक्षा देण्याच्या आराखडा तयार केला असून लवकरच सर्व 22 स्थानिक अनुसूचित भाषांमध्ये ही परीक्षा देता येणार आहे.