नाशिक-शिर्डी महामार्गावरील अपघातात 10 ठार; आराम बस आणि ट्रकच्या धडकेनंतर आक्रोश आणि किंकाळ्या

| Updated on: Jan 13, 2023 | 10:22 AM

आज पहाटेच सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्या मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक-शिर्डी महामार्गावरील अपघातात 10 ठार; आराम बस आणि ट्रकच्या धडकेनंतर आक्रोश आणि किंकाळ्या
nashik shirdi highway accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक: सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात खासगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात अनेकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आज पहाटेच सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्या मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, 6 महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांनी माहिती दिली. या अपघातानंतर एकच आक्रोश आणि किंकाळ्या सुरू झाल्या. प्रवाश्यांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने मदत केली.

हे सुद्धा वाचा

खासगी बसमधून 35 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींवर शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

दरम्यान, नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आतापर्यंत 10 जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले