हैदराबाद | 4 नोव्हेंबर 2023 : हैदराबाद पोलिसांनी एक खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला आहे. एका भाजी विक्रेत्याने 10 राज्यांमध्ये तब्बल 21 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.याप्रकरणी त्याच्यावर देशभरात 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात पीडितांच्या तक्रारीनंतर हैदराबाद पोलिसांनी अखेर २८ ऑक्टोबरला त्या भाजी विक्रेत्याला अटक केली. मात्र त्याचे कारनामे ऐकून पोलिस अधिकारीही हैराण झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजी विक्रेता ऋषभ हा फरिदाबादमध्ये भाजीचा व्यवसाय करायचा. कोविडमुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता, त्यामुळे त्याने फसवणूक करून लोकांची फसवणूक सुरू केली. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उदरनिर्वाहासाठी त्याने अनेक काम केली. पण वर्क फ्रॉम होम करताना त्याला ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल समजलं. एका जुन्या मित्राकडून त्याने ऑनलाइन गुन्हे करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याने मित्राकडून काही नंबर घेतले आणि फोन करायला सुरूवात केली. छोट्या नोकरीच्या बदल्यात मोठी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने लोकांना फसवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले.
कोरोनानंतर वळला गुन्ह्याच्या मार्गावर
एवढंच नव्हे तर त्याने डेहराडूनच्या एका मोठ्या व्यावसायिकाकडून 20 लाख रुपयेही उकळले. हॉटेल ग्रुपची वेबसाइट तयार करण्यासाठी आणि त्यासाठी रिव्ह्यू लिहीण्यासाठी तो लोकांना फोन करायचा. रिव्ह्यू लिहीणाऱ्या लोकांना त्याने पहिल्यांदा 10,000 रुपयेही दिले. त्यासाठी त्याने त्या हॉटेल्सच्या नावाने बनावट टेलिग्राम ग्रुपही स्थापन केला होता. काही बनावट पाहुण्याच्या नावे त्याने खोटे रिव्ह्यूदेखील दिले. प्रत्येक रिव्ह्यूसाठी १० हजार रुपये मिळाल्यानंतर पीडितांचा आरोपी रिषभवर विश्वास बसला.
चांगले काम देण्याच्या आमिषाने केली फसवणूक
दुसरं काम केलं तर जास्त पैसे मिळतील असे आश्वासन रिषभने पीडितांना दिलं. मात्र त्यांच्याकडून हळूहळू पैसे उकळत कोट्यवधी रुपये जमवल्यानंतर त्याने पीडितांना रिप्लाय देणं बंद केलं. फोन नंबरही बंद केला. अखेर त्याचा नंबर बंद होताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अखेर पीडितांनी पोलिसांशी संपर्क साधला.
अखेर पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्याचा शोध घेत हैदराबादमधून अटक केली. त्याचे कारनामे ऐकून पोलिसही हैराण झाले.
भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी इतर देशांतील व्यवस्थापक ऋषभसारख्या लोकांचा प्यादं म्हणून वापर करत असल्याचं तपासात समोर आलं. ऋषभमुळे कोट्यवधी रुपये चीन आणि सिंगापूरसारख्या देशांच्या व्यवस्थापकांकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका भाजी विक्रेत्याने मोठ्या, शिकल्या-सवरलेल्या लोकांना कसा चुना लावला हे पाहून पोलिसही अचंबित झाले. देशभरातील अनेक लोकांना फसवून त्याने लाखो नव्हे तर करोडो रुपये लुटले.