बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण उघडकीस येताच फक्त बदलापूर, मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात संतापाचं वातावरण होतं. याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक, त्याची तपासणी, नंतर पोलिस चकमकीत झालेला मृत्यू यामुळे तर ही केस आणखीनच गाजली. महिला, मुली काय शाळेत जाणाऱ्या चिमुरड्याही सुरक्षित नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतके महिने उलटूनही ही घटना अद्यापही कोणाला विसरता आलेली नसातानाच राज्यभरात अत्याचारांच्या नवनव्या केसेस समोर येतच आहेत. त्यातच आता विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या पुण्यातूनही असाच एक भयानक, धक्कायाक प्रकार उघडकीस आला आहे. शाळा पुन्हा असुरक्षित असल्याचंच त्यातून समोर आलंय.
पुण्यातील एका नामामकित शाळेत अवघ्या 11 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आलं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कुंपणानेच शेत खाल्लंय, शाळेतल्या एका शिक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. डान्स टीचरनेच 11 वर्षांच्या मुलाला नको तिथे स्पर्श करत घाणेरडं कृत्य केलंय. शाळेत समुपदेशन सुरू असतानाच हा सगळा प्रकार समोर आला असून प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक, मंगेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कर्वे नगरमधील एका नामांकित शाळेत ही घृणास्पद घटना घडली. पीडित विद्यार्थी हा 11 वर्षांचा असून आरोपी मंगेश साळवी हा त्या शाळेत डान्स टीचर म्हणून काम करतो. डान्स शिकवत असताना साळवे याने पीडित मुलाच्या शरीराला जाणूनबूजनी हात लावत नको तिथे स्पर्श केला. शाळेत समुपदेशन सुरू असताना पीडित विद्यार्थ्याने हा प्रकार सांगितला असता सर्वांनाच मोठा धक्का बसला. शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आणि त्या मुलाच्या आई-वडिलांना बोलावून घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी तातडीने वारजे पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दख ल घेत आरोपी टीचर मंगेशविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला बेड्या ठोकल्या. आणखी एक धक्कादायक गोष्ट यावेळी समोर आली ती म्हणजे, आरोपी शिक्षकाने यापूर्वी इतर विद्यार्थ्यांवर सुद्धा अत्याचार केले होते. आरोपीवर यापूर्वी अशाप्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.