मनिष मसोळे, टीव्ही 9 मराठी, धुळे / 11 ऑगस्ट 2023 : बॅनर फाडल्याच्या वादातून धुळ्यातील चरणपाडा गावात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटात जोरदार वादावादी होऊन दगडफेक झाली. इतकंच नाही तर पोलिसांवरही हल्ला झाला. पोलिसांची वाहनेही तोडली. या घटनेत 15 पोलीस आणि 3 नागरिक जखमी झाले. याप्रकरणी एकूण 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 13 जणांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात असून, सध्या सांगवीत तणावपूर्ण शांतता आहे. या दंगलीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. जमावाने समजावण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीवर देखील हल्ला केला. तसेच त्यांच्या गाडीवर दगडफेक करत तिला उलटवण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील सांगवीजवळ असलेल्या चरणपाडा गावात आदिवासी दिनाच्या शुभेच्छांचं बॅनर लावण्यात आलं होतं. ते बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडलं की फाटलं यावरून दंगल पेटली. बॅनर फाडल्यावरुन दोन गटात वाद झाला. हळूहळू हा वाद विकोपाला गेला आणि दोन गटात राडा सुरु झाला. मग मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरु झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र संतप्त जमाव ऐकायला तयार नव्हता. जमाव अधिक आक्रमक झाला आणि लाठ्या-काठ्यांचा वपारही सुरु झाला. यानंतर मुंबई-आग्रा महामार्गवार रास्ता रोको आंदोलन सुरु केले.
पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव अधिकच आक्रमक झाला. जमावाने पोलिसांची वाहने आणि घटनास्थळी समजावण्यासाठी आलेले आमदार काशीरमाम पावरा यांच्या गाडीवरही हल्ला केला. यात पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. एवढेच नाही तर 15 पोलीसही जखमी झाले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. तरीही जमाव नियंत्रणात येत नव्हता. यानंतर पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या. अतिरक्त कुमक मागवून पोलिसांनी अथक प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणापूर्ण शांतता आहे.