बंगळुरु | 23 ऑक्टोबर 2023 : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये भर दिवसा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू ( BMW CAR ) कारमधून चोरट्यांनी अवघ्या 50 सेंकदात काच तोडून 14 लाख रुपये लांबविले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असला तरी इतक्या मजबूत सुरक्षित गाडीतून पैसे चोरीला गेल्याने महागड्या गाड्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या डोळ्याच्या पापण्या लवतात न लवतात तोच मोटरसायकलीवर आलेले दोन तरुण कशी चोरी करतात हे पाहून महागड्या गाड्याही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये BMW X5 कार जवळ एक जण कार जवळ घुटमळताना तर त्याचा दुसरा साथीदार बाईकवरुन त्याची वाट पहात पळण्याच्या तयारीत दिसत आहे. अचानक कारजवळचा तरुण ड्रायव्हरशेजारील काच एका उपकरणाने झटक्यात तोडून त्या गाडीत शिरताना दिसत आहे. त्याचे केवळ पाय दिसतील इतका आत शिरुन त्या तरुणाने बॅगेत ठेवलेली कॅश घेऊन नंतर तो मोटारसायकलवर आधीच तयार असलेल्या साथीदाराच्या मदतने कॅश घेऊन पळून जाताना दिसत आहे.
येथे पाहा सीसीटीव्ही फुटेज –
BMW Window broken by 2 men to rob Rs 13.75 lakh cash near sub-registrar’s office in Sompura, Sarjapur. pic.twitter.com/zY8oXrXfSO
— Harsh (@Edsh4rsh) October 22, 2023
या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. या बीएमडबल्यू कारचा मालक बंगळुरुच्या अनेकल तालुक्यातील मोहन बाबू नावाचा व्यक्ती असल्याचे या संदर्भातील बातमीत म्हटले आहे. शुक्रवारी हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. भरदिवसा ही चोरी झाली असून सरजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराने मुथागट्टी गावात जमीन खरेदीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही कॅश घेऊन जात असल्याचे म्हटले आहे. पाच लाख त्याने मित्राकडून उधार घेतले होते. बाबू आणि त्याचा मित्र सोमपुरा सब रजिस्टार कार्यालयात पोहचले. तेव्हा दुपारी दीड वाजता कार गिरीयास आऊटलेट जवळ उभी केली. जेव्हा तासाभराने तक्रारदार बाबू या गाडीजवळ आला तर खिडकीची काच तुटलेली आणि रोकड चोरीला गेल्याचे समजले.