गाझियाबाद | 6 सप्टेंबर 2023 : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. रात्री -अपरात्री भुंकणे, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाठलाग करणे अशा अनेक घटना वाढत आहे. काही ठिकाणी तर भटक्या कुत्र्यांनी लोकांना चावल्याने (dog bite) ते गंभीररित्या जखमी झाले. मात्र प्राणीप्रेमी काही त्यांना आळा घालू देत नाहीत, त्यांचा बंदोबस्त करू देत नाहीत. कुत्र्यांमुळे एका निरागस, निष्पाप मुलाला जीव (boy died) गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाला कुत्रा चावला आणि त्याला अतिशय वेदनादायक मृत्यू आला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या मुलाला सुमारे दीड महिन्यापूर्वी कुत्रा चावला होता. मात्र भीतीमुळे त्याने कोणालाच, अगदी आई-वडिलांनाही ही गोष्ट सांगितली नाही. त्याची परिस्थिती प्रचंड बिघडल्यानंतर सत्य समोर आलं. रेबिज झाल्यामुळे त्याची तब्येत खूप खालावली, उपचारांसाठी आई-वडील ठिकठिकाणी भटकले. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही अन् शेवटी त्या 14 वर्षांच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला.
गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चरणसिंग कॉलनीतील ही दुर्दैवी घटना घडली. तेथे सोमवारी 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी शेजारच्यांचा पाळीव कुत्रा त्या मुलाला चावला होता. मात्र त्याने घरच्यांना याबाबत काहीच सांगितले नाही. अखेर काही दिवसांनी त्याला त्रास होऊ लागला, त्याचं वागणं बदललं, तो सतत आजारी पडू लागला, तेव्हा त्याच्या कुटुंबियांना हा प्रकार कळला.
अनेक रुग्णालयांतून आले माघारी
खरंतर , त्या मुलाला रेबिज झाला होता, ज्यामुळे त्याचं वागणं बदललं होतं. 1 सप्टेंबर पासूनच त्याने खाणं-पिणं सोडलं होतं अखेर त्याचे आई-वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. कुटुंबियांनी त्याला गाझियाबाद, दिल्ली आणि आसपासच्या अनेक रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी नेलं, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर त्याला बुलंदशहर येथे एका डॉक्टरकडे नेण्यात आलं. मात्र अँब्युलन्समध्ये असतानाच दुर्दैवाने त्याचा अंत झाला. त्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्धही तक्रार नोंदवली आहे.