करौली : राजस्थानमधील करौली जिल्ह्यात भाविकांसोबत मोठी दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. करौलीतील मंद्रयाल भागात चंबळ नदीत 17 भाविक बुडाल्याची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमने तात्काळ बचावकार्य सुरु करत 10 भाविकांना सुखरुप बाहेर काढले आहे. दोघांचा मृतदेह सापडले असून, पाच जण बेपत्ता आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता भाविकांचा नदीत कसून शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चिलाड गावातील 17 भाविक शनिवारी सकाळी कैला मातेच्या दर्शनासाठी चालले होते. सर्व जण करौली जिल्ह्यातील मंद्रयाल भागातील रोंधई गावाजवळील चंबळ नदीच्या छोई घाटावरून पायी नदी ओलांडत होते. यादरम्यान अचानक ते खोल पाण्यात गेले आणि एकामागून एक बुडू लागले. यामुळे नदीघाटावर एकच आरडाओरडा सुरु झाला.
नदीघाटावर भाविकांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे गावकरी धावत आले. गावकऱ्यांनी 10 प्रवाशांना सुरक्षित किनार्यावर आणण्यात यश मिळवले. नंतर पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतरही गावकऱ्यांनी आपले बचावकार्य सुरुच ठेवले. नदीत शोध घेत असताना दोन भाविकांचे मृतदेह सापडले आहेत. तर पाच भाविक अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनही बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले आहे. रेस्क्यू टीम नदीत भाविकांचा शोध घेत आहे.