कल्याण / 3 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत फसवणुकीचे प्रकारही तितकेच वाढले आहेत. अशीच आणखी एक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. घर विक्रीच्या नावाखाली एका महिलेला 18 लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याण-शिळ मार्गावरील पिसवली गावात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र प्रताप सिंग आणि सुमित्रा रविंद्र सिंग अशी आरोपी जोडप्याची नावे आहेत. बसंती पिल्लई या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जोडप्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. कल्याणमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. याबाबत काहीतरी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आरोपी रविंद्र आणि सुमित्रा यांची पिसवली गावात चाळीत रुम आहे. ही रुम त्यांनी बसंती पिल्लई या महिलेला 18 लाख रुपयांना विकली. कमी दरात रुम मिळतेय म्हणून पिल्लाई यांनीही झटपट व्यवहार केला. यानंतर त्यांनी रुममध्ये रहायला जायचे ठरवले. यासाठी सदर चाळ मालक अनिल मांझी यांच्याकडे गेल्या असता ती खोली मांझी यांची असल्याचे समजले.
सिंग दाम्पत्याने अशाच प्रकारे आणखी एकाला ही रुम विकली आणि पैसे उकळले. आपली फसवणूक झाल्याचे उघड होताच पिल्लई यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठत सिंग दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत असून, आरोपी जोडप्याचाही शोध घेत आहेत. दाम्पत्याने आणखी किती लोकांना किती पैशांचा अशा प्रकारे चुना लावला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.