वाढदिवसाचे सेलिब्रेशन पडले महागात, मित्रांनीच संपवले ‘बर्थडे बॉय’चे आयुष्य… दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश

| Updated on: Jun 06, 2023 | 12:46 PM

अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले, तर इतर दोन आरोपींना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

वाढदिवसाचे सेलिब्रेशन पडले महागात, मित्रांनीच संपवले बर्थडे बॉयचे आयुष्य... दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश
अनैतिक संबंधातू पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मित्रांसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन (birthday celebration) करणे एका तरूणाला भलतेच महागात पडले. कारण वाढदिवसाच्या पार्टीनंतर जेवणाच्या बिलावरून झालेला वाद त्याच्या जीवावर बेतला. दोन अल्पवयीन मुलांसह चौघांनी आपल्याच मित्राची हत्या (youth killed by friends)केल्याची धक्कादायक घटना गोवंडी येथे घडली आहे. मृत तरूण अवघ्या 18 वर्षांचा होता आणि त्याची हत्या करणारे त्याचेच चांगले मित्र होते, ज्यांच्यासोबत त्याने काही वेळापूर्वीच हसत-खेळत जेवण एन्जॉय केले होते. जेवणाचे बिल दहा हजार रुपये आले होते, त्या मुद्यावरून त्यांचे वाजले आणि मग त्याच मुलाला जीव गमवावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी 19 आणि 22 वयोगटातील आणि मूळचे उत्तर प्रदेशातील असलेल्या दोन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली, तर अल्पवयीन मुलं ही स्वत:च पोलिसांसमोर शरण आली होती व नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिस म्हणाले.

शिवाजी नगर येथील पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने 31 मे रोजी एका ढाब्यावर वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती आणि जेवणाचे बिल सुमारे 10,000 रुपये आले. बिलाची रक्कम वाटून घेण्यावरून पीडित आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला, मात्र त्यानंतर पीडित मुलाने त्याच्याच खिशातून पैसे देऊन वाद मिटवला.

त्यानंतर चारही आरोपींनी त्यांच्या मित्रासाठी आणखी एक वाढदिवसाची पार्टी आयोजित केली आणि त्यांच्या मित्राला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. त्याला केक खाऊ घातल्यानंतर, त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी अनेक वेळा हल्ला केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर १७ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तर त्यांच्या प्रमुख मित्रांना 2 जून रोजी मुंबई गुन्हे शाखेने अहमदाबाद येथून उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी गोंडा येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले, असे पोलिस म्हणाले.

याप्रकरणी अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले, तर इतर दोन आरोपींना भारतीय दंड संहितेच्या (IPC) 302 (हत्या) सह संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.