मुंबई : महाराष्ट्रात दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांची प्रकरणे समोर येत आहेत. अशाच परिस्थितीत ठाण्यातही असा एक गुन्हा उघडकीस आला असून त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हो, हे खरं आहे. महिलेच्या गोड आवाजात फोनवर बोलून 19 व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा पद्धतीने लाखो रुपये उकळणाऱ्या दोन भामट्यांना मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया…
19 गुन्हे उघड
मनिष शशिकांत आंबेकर (वय 44, पळस्पे, पनवेल) आणि अन्वर अली कादिर शेख (वय 48, कर्जत, रायगड) अशी या दोन भामट्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये पैसे उधळून मजा लुटण्यासाठी ते दोघे हे फसवणूकीचे कृत्य करत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरातमध्येही त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून दोघांच्या नावे 19 गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.
अशी केली फसवणूक
मनीषने 7 मे रोजी भाईंदर पूर्वेतील श्रीराम ज्वेलर्सचे व्यवस्थापक चेन जैन यांना महिलेच्या आवाजात कॉल केला. आपण डॉक्टर असून सोन्याच्या चार तोळ्याच्या बांगड्या बनवायचे असल्याचे मनिषने जैन यांना सांगितले. बांगड्यांची साईज व दोन लाख रुपये ॲडव्हान्स देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला साई आशीर्वाद या रुग्णालयाजवळ पाठवा, असेही त्याने सांगितले. तसेच (आपल्याकडे) दोन हजारांच्या नोटा असल्याने दोन लाख रुपयांच्या 500च्या नोटा आणण्यासही सांगितले, असेही जैने यांनी तक्रारीत नमूद केले.
त्यानुसार, चेतन हे पैसे घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहोचले, तेथे पहिल्या मजल्यावर मनीषने त्यांना अडवले. मॅडम तिसऱ्या मजल्यावर आहेत, तेथे जाऊन तुम्ही बांगड्यांचे माप व चार लाख रुपये घ्या, असे मनीषने त्यांना सांगितले. चेतन हे तिसऱ्या मजल्यावर गेले असता तेथे त्यांना कोणतीही महिला डॉक्टर आढळली नाही. तेव्हा ते लगबगीने पहिल्या मजल्यावर आले, तोपर्यंत मनीषने तेथून पोबारा केला होता. आपण फसवले गेल्याचे लक्षात येताच चेतन यांनी दुसऱ्या दिवशी, 8 मे रोजी नवघर पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
त्यानंतर गुन्हे शाखेतील पोलिसांच्या पथकाने सायबर शाखेच्या पोलिसांच्या मदतीसह तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांनी मनिष व शेख या दोघांना काशीमिरा पोलिस ठाणे हद्दीतील एका लॉजमधून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून साडेनऊ हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन जप्त केले. नंतर त्यांना नवघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या दोघांनीही आत्तापर्यंत पुणे, कोपरखैरणे, खांदेश्वर, नाशिक,कळंबोली, पनवेल, कोल्हापूर, मीरा रोड तसेच गुजरातमधील अनेक दुकानदारांना फसवले आहे.