एखादा गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असतं. कधी कधी गुन्ह्याची उकळ पटकन होते. पण अनेकदा वर्ष उलटून जातात तरी आरोपीचा शोध लागत नाही. त्यामुळे कायद्याचे हात लांब असले तरी काही प्रकरणात ते तोकडे पडतात असं म्हणायला हरकत नाही. पण आता एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) तंत्रज्ञानामुळे पोलिसांच्या हाताला आणखी बळ मिळणार आहे. 19 वर्षानंतर एका हत्येचं प्रकरण एआय तंत्रामुळे असंच उलगडलं आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा कसा वापर करता येऊ शकतो हे अधोरेखित झालं आहे. सर्वात आधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात. 10 फेब्रुवारी 2006 रोजी म्हणजे आजपासून 19 वर्षांपूर्वी केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील अंचल येथे हा हत्येचा धक्कादायक प्रकार घडला होता. संतम्मा या पंचायत ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण त्यांनी डोळ्यासमोर पाहिलेलं दृष्य एकदम भयानक होतं.
संतम्मा जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांची मुलगी रंजिनी आणि तिचे 17 दिवसांची जुळी मुली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. या तिघांची गळा कापून हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून तपास सुरु केला. या प्रकरणात दोन आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. दिविल कुमार आणि राजेश हे दोन्ही आरोपी त्या दिवसापासून फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण आरोपी त्यांच्या हाती लागले नाही. वर्षामागून वर्षे लोटली आणि हे प्रकरणही थंड झालं. पण बोलतात ना, भगवान के घर देर है अंधेर नहीं.. अगदी तसंच झालं.
केरळ पोलिसांच्या गुप्तचर विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केला. आरोपींचे जुने फोटो आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून आता म्हणजेच 19 वर्षानंतर कसे असतील याबाबत तपासणी केली. सोशल मीडियावर या फोटोची चाचपणी केल्यानंतर एका लग्नातील फोटोत 90 टक्के समानता असलेला फोटो आढळला. सदर व्यक्तीचा फोटो पुडुचेरीतील होता आणि त्याचं नाव प्रवीण कुमार सांगितलं जात होतं. पण पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांनी दिविल कुमार आणि राजेशच्या मुसक्या आवळल्या.
द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, केरळचे एडीजीपी मनोज अब्राहम यांनी सांगितलं की, एआयच्या माध्यमातून या गुन्ह्याची उकल झाली आहे. एआय जनरेटेड फोटो फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोसोबत 90 टक्के जुळून आला. त्यानंतर आरोपी राजेशला पुडुचेरीत ट्रॅक केलं आणि दिविलचाही थांगपत्ता लागला. दोघंही इंटिरियर डिझाइनचं काम करत होते. दिविलने विष्णु, तर राजेशने प्रवीण कुमार नाव ठेवलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजीनी आणि दिविल एकाच गावातले होते. दोघांमध्ये संबंध होते आणि रंजीनीने गर्भवती असल्याचं सांगितलं. तेव्हा दिविलने त्या नात्याला नकार दिला आणि पठाणकोटला गेला. पण रंजिनी मुलांना जन्म देण्यासाठी अडून राहिली आणि नात्यात वितुष्ट आलं. तिने जानेवारी 2006 मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. तेव्हा राजेशने अनिल कुमार असल्याचा बनाव करून रंजिनीशी दोस्ती केली आणि मदतीचं आश्वासन दिलं. राजेश आणि दिविल दोघंही सैन्यात सहकारी होते. तिथेच त्यांनी हत्येचा कट रचला होता.
रंजिनी महिला आयोगात गेली आणि तिने दिविलची डीएनए टेस्ट करण्याचा आदेश मिळवला होता. असं सर्व घडत असताना राजेशने रंजिनीच्या आईला पंचायत ऑफिसात जाण्यासाठी कसं बसं तयार केलं. त्याच दरम्यान त्याने रंजिनी आणि तिच्या जुळ्या मुलींची हत्या केली. तसेच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पठानकोट मिलिट्री कॅम्पपर्यंत धडक मारली. पण आरोपी काही हाती लागले नाही.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रंजिनीच्या आईने सांगितलं की, राजेश जो की अनिल कुमार म्हणून वावरत होता. त्याने रुग्णालयात जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि रक्ताची गरज असल्याचं सांगत आसपास फिरत राहिला. इतकंच काय तर भाड्याच्या घरात शिफ्ट झाल्यानंतरही राजेश तिथे येत होता. दरम्यान, दिविलच्या कुटुंबियांनी रंजिनीच्या चारित्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा तिने डीएनए टेस्टची मागणी केली होती.