भांडणावरून संशय आला, पोलिसांनी हाणून पाडला लहान मुलांच्या अपहरणाचा डाव

| Updated on: Oct 07, 2024 | 1:18 PM

चोरीला किंवा भीकेला लावण्यासाठी लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पालघर येथील कासा पोलिसांच्या मदतीने दोन लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला.

भांडणावरून संशय आला,  पोलिसांनी हाणून पाडला लहान मुलांच्या अपहरणाचा डाव
Crime News
Follow us on

पैसे कमावण्यासाठी लोक वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात. कोणी मेहनतीचा मार्ग निवडत पण कोणी वाईट मार्गाने पैसे कमवायलाही मागेपुढे पहात नाही. चोरी-मारी करूनही पैसे कमावण्याचा मार्ग काही जण निवडतात. असाच एक प्रकार पालघरजवळ उघडकील आला. स्वत: मेहनत न करता, चोरीला किंवा भीकेला लावण्यासाठी लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पालघर येथील कासा पोलिसांच्या मदतीने दोन लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला.

पालघर येथील कास पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली . पोलिसांनी दोन्ही मुलांची सुटका करत त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरूपरित्या सोपवलं आहे. तर चार जणांन अटक केली असून त्यांनी या आधीही असे गुन्हे केले होते का, याची चौकशी सुरू आहे.

असा लागला मुलांचा शोध

अंबरनाथ येथे राहणारे अखिलेश प्रसाद मिश्रा यांना सूरज ( वय 9) आणि सत्यम (वय 6) अशी दोन मुलं आहेत. मात्र ते दोघे अचनाक घरातून बेपत्ता झाले. ते दोघे कल्याणला आल्याची माहिती वडिलांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडे तक्रार दिली. कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी विनोद पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले. दोन्ही मुले कल्याण बस डेपोतून एका बस मधून निघून गेल्याची माहिती समोर आली. पोलिस तपास करीत होते तेव्हाच पोलिस स्टेशनमध्ये बसलेले अखिलेश मिश्रा यांना फोन आला.

फोन करणारा व्यक्ती एक पोलिसच होता. आपण कासा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत त्याने मिश्रा यांचा मुलगाही सोबत असल्याचे नमूद केले. ते ऐकताच अखिलेश यांना अश्रू अनावर झाले. बोलत असलेला मुलगा त्यांचाच होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ सत्यम देखील होता. हे दोन्ही मुले कास पोलिस ठाण्यात होते.

भांडणामुळे उलगडला अपहरणाचा डाव

पालघर येथील चारोटी नाका परिसरात गरबा सुरु असताना काही महिला पुरुष पैशासाठी भांडत होते. त्यांच्या सोबत दोन लहान मुलं होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मुलं कुठून आली याची चौकशी केली . तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली . चोरी किंवा भिक मागण्यासाठी या मुलांचा वापर केला जाणार होता असे उघड झाले. त्यांच्यापैकी एकाला वडिलांचा मोबाईल नंबर लक्षात होता. त्याने पोलिसांना सांगितल्यावर फोन लावून देण्यात आला आणि अशा प्रकारे मुलांचा शध लागला.

याप्रकरणी चौघांना कासा पोलिसांनी अटक करून त्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी आणि चंदा गोसावी अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघे सांगली येथील मिरज येथे राहणारे आहेत. दोन्ही महिला आणि पुरुष हे सराईत चोरटे आहेत. या मुलांचे अपहरण करुन या मुलांकडून चोरी आणि भीक मागण्यास लावणार होते, अशी कबूली दिली आहे. या चौघांनी असाच प्रकार अन्य कोणासोबत केला आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.