गुजरात : गुजरातमधील सुरत येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका रुग्णवाहिकेतून (Ambulance) पोलिसांनी तब्बल 25 कोटी 80 लाखांचे बनावट चलन जप्त (Fake Notes Seized) केले आहे. या रुग्णवाहिकेवर सुरतमधील एका ट्रस्टचे (Trust in Surat) नाव लिहिण्यात आले होते. रुग्णवाहिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट चलन पाहून पोलीसही चक्रावून गेले. रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस चालकाची कसून चौकशी करत आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेवर दिकरी एज्युकेशन ट्रस्ट मोटा वडाळा सुरत असे लिहिले होते. तसेच गौ माता राष्ट्रमाता असेही लिहिण्यात आले होते.
रुग्णवाहिकेत एकूण 6 पेट्या होत्या. या पेट्यांमध्ये 2-2 हजारांच्या बनावट नोटा होत्या. नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिव्हर्स बँक ऑफ इंडिया आणि फक्त सिनेमाच्या शूटिंगसाठी लिहिलेले आहे.
अहमदाबादहून मुंबईकडे जाणारी रुग्णवाहिका बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती कामरेज पोलीस ठाण्याला मिळाली. मिळालेल्या माहितीवरु कामरेज पोलिसांनी महामार्गावर सापळा रचला. पोलीस पथकाने महामार्गावर असलेल्या शिवशक्ती हॉटेलजवळ नाकाबंदी करून रुग्णवाहिका अडवली. त्यानंतर रुग्णवाहिकेची तपासणी केली.
तपासणीत रुग्णवाहिकेत 6 पेट्या आढळून आल्या. या पेट्या खोलून पाहिल्या असता त्या दोन हजार रुपयाच्या 25 कोटी 80 लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी या जप्त करत रुग्णवाहिकेच्या चालकालाही ताब्यात घेतले. हितेश पुरुषोत्तम कोटडिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे.