कल्याण : कल्याणमध्ये एका बेरोजगार तरुणाला मोठ्या पदावरील नोकरीचे आमिष (Lure) दाखवून, कागदपत्र पडताळणीसाठी लिंक पाठवून त्याच्या खात्यातून चार लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. महात्मा फुले पोलीस (Mahatma Phule Police) ठाण्याचा हद्दीत ही घटना घडली आहे. योगेश चेऊलकर असे फसवणूक (Fraud) झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुले पोलिसांनी विशाल शर्मा व कृष्णा रामराव या दोन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत तंत्रज्ञान खात्याकडे वर्ग करत तपास सुरू केला आहे.
कल्याण पश्चिम येथे राहणारे योगेश चेऊलकर यांनी नोकरीसाठी एका ठिकाणी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेण्यात आली. यावेळी कॉग्नीजन्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. हे तिन्ही पदाधिकारी बोगस असून त्यांनी सीनियर मॅनेजर पदावर निवड झाल्याचे सांगत नोंदणी प्रक्रियेसाठी साडेसहा हजार रुपये द्या असे सांगितले. योगेशने हे पैसे देताच पुन्हा कागदपत्र पडताळणीसाठी 18 हजार रुपये देण्यास सांगितले. हे पैसे देखील योगेश यांनी दिले. त्यानंतर योगेश यांना एक लिंक पाठवून दिली. तुमच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करायची आहे, त्यासाठी एक लिंक देतो ती लिंक उघडा असे सांगितले.
योगेश यांनी लिंक उघडताच भामट्यांनी योगेश यांच्या एचडीएफसी बँक अंधेरी शाखा, कल्याणमधील संतोषी माता रोड शाखा आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सात व्यवहार करुन योगेश यांच्या बँक खात्यामधून खोटी कारणे देऊन 4 लाख 9 हजार 694 रुपये परस्पर वळते केले. योगेश यांना हे लक्षात येताच त्यांनी भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. (4 lakhs extorted from a young man by luring him with a job in Kalyan)