एका महिला बँक कर्मचाऱ्याने पाच कोटी रुपये चोरले. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून तिनं प्लास्टिक सर्जरी केली. दुसऱ्या राज्यात जाऊन राहू लागली. २५ वर्षांनंतर तिची चोरी पडकली गेली. तिच्याविरोधात भ्रष्टाचार, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. ही घटना चीनमध्ये घडली. पाच कोटी रुपयांची चोरी करणाऱ्या महिलेचं नाव चेन येल आहे. १९९७ मध्ये ती येकिंग प्रांतातील चीन कंस्ट्रक्शन बँकेत क्लर्क होती. काम करताना ती गायब झाली. गायब होण्यापूर्वी तिने ४ कोटी ८० लाख रुपये चोरी केले. पैसे चोरी करून ती दुसऱ्या प्रांतात सेटल झाली. त्यावेळी तिचे वय २६ वर्षे होते.
दरम्यान, तिनं स्वतःच्या चेहऱ्याची सर्जरी करून घेतली. आपली ओळख बदलविली. दुसरं लग्न केलं. स्वतःचा व्यवसाय सुरू केला. परंतु, २५ वर्षांनंतर तिची चोरी पकडली गेली. तपास अधिकारी तिला शोधत होते.
चिनी अधिकाऱ्यांनी २५ वर्षे फरार झालेल्या येलवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शिवाय घटस्फोट न देता दुसरं लग्न केल्याचाही गुन्हा नोंदविला. येलने सर्व गुन्हे कबुल केलेत. तिला न्यायालयात हजर करण्यात आले. वुई चॅट पब्लिक प्रोसेक्युटरनं म्हटलं, तपास अधिकाऱ्यांनी हार मानली नाही. तपास सुरू ठेवला.
येलनं ही रक्कम लपविण्यासाठी घराचा वापर केला होता. सुमारे दोन कोटी रुपये घरी वेगवेगळ्या चार ठिकाणी ठेवले होते. टॉयलेटमध्येही काही पैसे लपविले होते. सुमारे दीड कोटी रुपये आपल्या भाऊ-बहिणीच्या अकाउंटला ट्रान्सफर केले होते. हे सर्व केल्यानंतर तीन दिवसांनी घरच्यांना ही माहिती दिली होती.