एका इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग आलं नाही म्हणून निर्दयी शिक्षिकेने अवघ्या 7 वर्षांच्या मुलाला काठीने अमानुष मारहाण केल्याची अत्यंत भयानक आणि तेवढीच संतापनजनक घटना अंबरनाथमधील शाळेत घडली आहे. त्या शिक्षिकेने चिमुकल्या मुलाच्या पाठीवर आणि पायावर काठीने सपासप फटके दिले. ही घटना उघडकीस आल्यावर संतापाची लाट उसळली असून त्या निर्दयी शिक्षिकेविराधोत अंबरनाथ पश्चिम पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला जेलची हवा खावी लागणार आहे.
नेमकं झालं तरी काय ?
अंबरनाथ शहरातील पश्चिमेला असणाऱ्या साऊथ इंडियान शाळेत लहान मुलाला बेदम मारहाण केल्याचा हा अमानुष प्रकार घडला आहे. पीडित मुलगा अवघ्या 7 वर्षांचा असून तो या शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. घटनेच्या दिवशी त्या विद्यार्थ्याला त्याची वर्गशिक्षिका विजयश्री शकेवार हिने एका शब्दाचं स्पेलिंग विचारलं. मात्र त्या मुलाला काही ते स्पेलिंग सांगता आलं नाही, त्याचं ते स्पेलिंग चुकलं. ते पाहून चिडलेली शिक्षिका विजयश्री हिने काठी घेऊन त्या चिमुरड्या मुलाच्या पाठीवर आणि पायावर सपासप फटके दिले, त्याला अमानुष मारहाण केली.
या सगळ्यामुळे तो मुलगा अतिशय भेदरला. त्या दिवशी घरी आल्यावरही तो गप्प-गप्पच होता. मुलाचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात आल्यावर त्याच्या आईने त्याला प्रेमने जवळ घेऊन विचारपूस केली असता त्याचा बांध फुटला. आणि त्याने रडत रडत आईला शाळेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. शिक्षिकेने मुलाला मारहाण केल्याचं ऐकून त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र तिच्या या वागण्याविरोधात आवाज उठवण्यासाठी पीडित मुलाच्या आईने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षिका विजयश्री शकेवार हिच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्या आधारे पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यामुळे आता या शिक्षिकेला जेलमध्ये जावं लागणार आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये संतापाची लाट उसळली असून लहान मुलांना अशी अमानुष वागूक कोणी कसं देऊ शकतं असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.