चोरीचा तपास करायला गेले अन् घबाडच हाती लागले, नौपाडा पोलिसांची धडक कारवाई

| Updated on: Mar 02, 2023 | 9:31 AM

ठाण्यातील नौपाडा परिसरात मोबाईल चोरीचा तपास करत असतानाच पोलिसांच्या हाती चोरट्याकडून घबाडच लागल्याचे उघड झाले. चार मोबाईल चोरीचा तपास करताना पोलिसांच्या हाती 98 मोबाईल लागले.

चोरीचा तपास करायला गेले अन् घबाडच हाती लागले, नौपाडा पोलिसांची धडक कारवाई
ठाण्यात मोबाईल चोराला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे / गणेश थोरात : ठाण्यातील नौपाडा परिसरामध्ये एका बंद घराचे दार तोडून सराईत चोरट्याने चार मोबाईल चोरले होते. त्याच चोरीचा तपास करत असताना नौपाडा पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले. केवळ चार मोबाईल चोरीचा तपास करणाऱ्या नौपाडा पोलिसांना शेकडो मोबाईल सापडल्याने सगळेच चक्रावले. पोलिसांनी या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल समद नूर मोहम्मद सकानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नौपाडा परिसरातून चार मोबाईल चोरले होते

ठाण्यातील मध्यवर्ती असलेल्या नौपाडा परिसरामध्ये 23 फेब्रुवारी रोजी एक बंद घराचे दार तोडून चोरट्याने चार मोबाईल लंपास केले होते. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. मोबाईल चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंब्रा कौसा येथे राहणाऱ्या गुन्हेगाराला ताब्यात घेतले.

आरोपीकडे घबाडच सापडले

अब्दुल समद नूर मोहम्मद सकानी असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता मोबाईलचे घबाड पोलिसांच्या हाती लागले. आरोपीने चोरीला गेलेले चार मोबाईल तर परत केलेस पण त्यासोबतच जवळपास 98 महागडे मोबाईल, एक लॅपटॉप आणि दोन मोटारसायकल जप्त करण्यात नौपाडा पोलिसांना यश आले.

हे सुद्धा वाचा

आरोपीवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल

या अट्टल गुन्हेगारावर ठाण्यातील विविध पोलीस स्थानाकांमध्ये आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी आपल्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि चोरी होताच त्वरित स्थानिक पोलिसात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी केले.