पालघर / प्रवीण चव्हाण : जुन्या वादातून तलासरी तालुक्यातील डोंगरी येथील 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. आजोबासोबत असलेल्या पैशाच्या जुन्या वादातून चिमुरडीसोबत हे भयानक कृ्त्य केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या 12 तासाच्या आत तपास करत आरोपीला अटक केली आहे. रमेश डायला दुबळा असे अटक करण्यात आलेल्या 46 वर्षीय इसमाचे नाव आहे. पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीने संधी साधत तिचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार केला. मग गुन्हा लपवण्यासाठी मुलीची हत्या केली.
तलासरी तालुक्यातील डोंगरी येथील 10 वर्षीय मुलगी मंगळवारी सकाळी शाळेत जाण्यास निघाली. मात्र सायंकाळी मुलगी घरी परत आलीच नाही. यामुळे पालकांनी गावात शोधाशोध केली. परंतु मुलीचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर पालकांनी तलासरी पोलीस स्टेशन गाठत रात्री उशिरा अज्ञात इसमाने मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तलासरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध पथकं तयार करून मुलीच्या शोधार्थ आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना परिसराजवळ राहणाऱ्या इसमाने अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेचच्या आधारे निष्पन्न झाले. अधिक तपास आणि चौकशी करत सदर इसमाला ताब्यात घेत पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपीने शाळेत जात असताना अपहरण करत हत्या केल्याचे कबुल केले.
आरोपी हा मुलीच्या आजोबासोबत समुद्रात बोटीत मासेमारीकरीता खलाशी म्हणून जात होता. परंतु खलाशी असताना देवाण-घेवाणीतील पैसे दिले नाहीत म्हणून वारंवार त्यांच्यात खटके उडत होते. याचा मनात राग धरून नराधम दुबळा याने मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिला गुजरात राज्यातील भिलाड संजान रोडवरील वनविभागाच्या जंगलाच्या झाडी झुडपात नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली.
हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पालापाचोळ्यात लपवून पोलीस आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाही, अशा समजुतीत घरी आला होता. परंतु पोलीस निरीक्षक अजय वसावे आणि उपनिरिक्षक यांच्या पथकाने कसलाही पुरावा नसताना शोध घेत आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या.