कल्याण / सुनील जाधव : इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 12 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली. कैलास नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मुलगा खड्ड्यात पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी हजर झाले. अग्नीशमन दलाने मुलाचा शोध सुरु केला. एका स्थानिक नागरिकाने अग्नीशमन दलाची मदत करत गाळात रुतलेला मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
कल्याण पूर्वेत इमारतीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याच्या जवळ असलेल्या वस्तीत मयत मुलगा आपल्या कुटुंबासोबत राहतो. शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी येत असताना त्याला या खड्ड्यात बॉल दिसला. मुलगा हा बॉल काढताना खड्ड्यात वाकला असता त्याचा पाय घसरला आणि तो खड्ड्यात पडला.
स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गाळात रुतला. यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बोटीच्या मदतीने मुलाचा शोध सुरू केला. यावेळी एका स्थानिक नागरिकाने अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या मदतीला धाव घेत खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकाने या जागेवर असलेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी इमारत तोडल्यानंतर दोन महिन्यापूर्वी हा खड्डा खोदला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हा खड्डा भरला आणि आजूबाजूची माती, कचरा जाऊन यात गाळ तयार झाला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.