फेसबुकवर (Facebook) एका अकरावीतील मुलीची ओळख बांगलादेशी (Bangladesh) तरुणासोबत झाली. या तरुणाशी लग्न करण्यासाठी तरुणीने भारत देश सोडला. सीमा पार केली आणि तरुणी लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी थेट बांगलादेशात पोहोचली. तिच्या घरातल्यांना याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती. पण लग्नानंतर 10 महिन्यांनीच या मुलीची पुन्हा भारतात येण्यासाठी धडपड सुरु झाली. ज्या मुलासोबत लग्न करण्यासाठी तरुणीने आपला देश (India) सोडला होता, तो मुलगा आपल्याकडून चुकीच्या गोष्टी करुन घेत असल्याचा आरोप मुलीने केलाय. अखेर आता या मुलीची सुटका करण्यात आली आहे. या मुलीला आपल्या आईवडिलांच्या हवाले करण्यात आलंय.
पश्चिम बंगालच्या नदीया जिल्ह्यातील तेहरपूरमधील ही घटना आहे. सोळा वर्षांच्या मुलीची ओळख फेसबुकवरुन एका बांगलादेशी तरुणाशी झाली. या मुलासोबत आधी मैत्री, नंतर प्रेम आणि अखेर लग्न, असा प्रवास या तरुणीने केला. हा प्रवास करण्यासाठी अकरावीत शिकणारी ही सोळा वर्षांची तरुणी घर सोडून चक्क बांगलादेशात गेली. गेल्या वर्ष जानेवारी महिन्यात तिची या तरुणीसोबत ओळख झाली होती. पण दहा महिन्यातच या तरुणीला वाईट अनुभव आला.
पीडित मुलगी घरात कुणालाच काहीही सांगून न गेल्यानं या मुलीचे आईवडील अस्वस्थ झाले होते. मुलगी कुठे गायब झाली, असा प्रश्न त्यांना पडला. अखेर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पण कुठेच पत्ता लागला नाही.
यानंतर मुलीच्या आईला एक दिवस अचानक मुलीने बांगलादेशातून फोन केला. मी चोरुन फोन केलाय आणि तुझ्याशी बोलतेय, असं मुलगी सांगू लागली. रडत रडत तिने आपल्यासोबत गैरप्रकार होत असल्याचं आईला सांगितलं. आपल्याला इथून बाहेर निघायचंय, पुन्हा मायदेशी परतायचंय, असं ती आईला सांगू लागली. ज्या बांगलादेशी युवकाशी मी लग्न केलंय, तो माझ्याकडून गैरकृत्य करवून घेतोय, असं तरुणीने फोनवरुन सांगितलं. हा तरुणी बांगलादेशच्या कुश्तिया जिल्ह्यातील मेहरपूर येथील राहणारा असल्याचीही माहिती तिने दिली.
अखेर मुलीच्या आईवडिलांनी सगळा राग बाजूला ठेवला. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी स्थानिक पोलीस स्ठानक गाठलं. मुलीला पुन्हा मायदेशी कसं आणता येईल, यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पोलीस, राजकीय मदत, सामाजिक कार्यकर्ते, या सगळ्यांच्या साथीने मुलीला पुन्हा परत आणण्यासाठी तिचे आईवडील धडपडू लागले.
यानंतर बांगलादेश सरकारशी संपर्क करण्यात आलं. बांगलादेश पोलिसांनी पीडित मुलीला जिथे लपवण्यात आलं होतं, तिथून ताब्यात घेतलं आणि तिची सुटका केली. यानंतर दोन्ही देशांच्या मदतीने मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं.
10 महिन्यांपूर्वी मुलगी आणि तिच्या आईवडिलांची ताटातूट झाली होती. आता पुन्हा एकदा ते एकमेकांना भेटले आहेत. याबाबत मुलीने आनंद व्यक्त केलाय. फेसबुकवर भेटलेल्या तरुणाने या तरुणीला लग्नाचं आमीष दाखवलं होतं. पण लग्नानंतर या तरुणीचा अपेक्षाभंग झाला. वाईट कृत्य करण्यासाठी हा तरुण तिला भाग पाडत होता, असा आरोप तिने केलाय. त्यानंतर तिने सुरक्षित राहण्यासाठी एका मानसिक पुनर्वसन केंद्र गाठलं होतं. याच ठिकाणावरुन मुलीला बांगलादेश पोलिसांनी ताब्यात घेत नंतर तिची सुटका करत तिला भारताकडे सोपवलं होतं.