नाशिक : आजही समाजात मुलींना नाकारलं जात असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. मुलगी नकोशी झाल्याने जन्मदात्या आईने तिला भर पावसात टाकून पळ काढला. हा धक्कादायक प्रकार घाटनदेवी मंदिर (Ghatandevi Temple) परिसरात समोर आला आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या घाटनदेवी मंदिर परिसरात ही घटना समोर आली आहे. जवळपास चार दिवसांच्या असलेल्या मुलीला भर पावसात मंदिराच्या बाजूला टाकून एक अज्ञात महिला फरार झाली आहे. मंदिर परिसरात काल रात्री साडेआठच्या सुमारास दर्शनासाठी गेलेल्या जितेश महेश चारमिया (Jitesh Charmia) रा. गांधीनगर, इगतपुरी या इसमास बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांचे लक्ष गेले. त्यांनी आजूबाजूला पहिले. पण त्यांना कोणी दिसले नाही. त्यांनी या नकोशीच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कुणीच आढळले नाही.
बाळ जास्त रडत असल्याने व बराच वेळ होऊन गेला तरी कोणीच न आल्याने चारमिया यांनी या नकोशीला वैद्यकीय उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी लिलके यांनी उपचार करून याबाबत इगतपुरी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे हे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. इगतपुरी पोलीस या नकोशीच्या मातेचा शोध घेत आहेत. चार दिवसांच्या या नकोशीला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु उपचार कक्षात ठेवण्यात आले आहे.
चार दिवसांची चिमुकली. रडत होती. एका व्यक्तीला ती दिसली. त्यांनी आजूबाजूला शोधले. तिथं कुणीच नव्हते. त्यामुळं मुलीला इगतपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चार दिवसांच्या मुलीला तिच्या निर्दयी आईनं तिथंच सोडून दिल असावं, असा अंदाज बांधण्यात येत आहे. कदाचित अनैतिक संबंधातून मुल जन्माला आलेलं असावं, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळं आता त्या चिमुकलीच्या मातेचा शोध घेतला जात आहे. अन्यथा मुलीला बालसुधारगृहात सोडावे लागणार आहे.