भिंड, मध्य प्रदेश : माणुसकीची चिरफाड करून झालेलं क्रूर कृत्य समोर आलंय. ही घटना आहे मध्य प्रदेशची. भिंड जिल्ह्यातून ही भयंकर माहिती समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या बालकाचा मृतदेह कुलरमध्ये ठेवण्यात आला. दुपारी ट्यूशनसाठी निघालेलं लेकरू तिथवर पोहोचलंच नाही. इकडे तो घरी येण्याचा वेळ संपल्यावर पालकांची शोधाशोध सुरु झाली. पोलिसांपर्यंत प्रकरण गेलं. अखेर परिसरातीलच एका कुलरमध्ये त्याचा मृतदेह आढळला.
भिंड येथे ही भयंकर घटना घडली. मछंड पोलीस स्टेशनचे प्रभारी विवेक प्रभात यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांचा हा मुलगा बुधवारी दुपारी ३.३० वाजता ट्युशनला जाण्यासाठी निघाला. पण तो ट्युशनला पोहोचलाच नाही. तो वेळेवर घरी आला नाही, त्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरु केली. बुधवारी तो ट्यूशनला आलाच नाही, असं कळलं. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली.
नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. या मुलासोबत ट्युशनला जाणाऱ्या इतर मुलांची चौकशी केली. यात कळलं की, शेजारी राहणाऱ्या संतोष चौरसिया यांच्या घरी तो गेला होता. त्यानंतर तो ट्यूशनला आलाच नाही. या माहितीच्या आदारे पोलिसांनी संतोष चौरसिया यांच्या घराची झडती घेतली. तिथलं दृश्य पाहून पोलिसही हादरले.
संतोष चौरसिया यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर कुलरमध्ये त्या मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाचे हात-पाय बांधले होते. पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढला. आपल्या पोटच्या पोराचे असे हाल पाहून आई-वडिलांना प्रचंड धक्का बसला.
लहानग्या मुलाचे असे हाल करण्याची ही कोणती विकृती? ज्या संतोष चौरसिया यांच्या घरी या चिमुरड्याचा मृतदेह आढळला, तो सध्या फरार आहे. पोलीस सध्या या मुलाच्या कुटुंबियांची तसेच कॉलनीतील इतरांची कसून चौकशी करत आहे. या क्रूरतेमागे नेमकं काय कारण आहे? कौटुंबिक की अन्य एखादी विकृती, याचा तपास पोलीस करत आहेत.