Thane Child Drowned : घराच्या छतावर सायकल चालवत होता चिमुकला, अचानक तोल गेला अन्…

| Updated on: Jul 14, 2022 | 10:33 PM

बुधवारी सायंकाळी हा चिमुकला एका घराच्या छतावर सायकल चालवत होता. मात्र छताला सुरक्षा भिंत नसल्याने या चिमुकल्याचा तोल जाऊन तो खाडीत पडल्याची धक्कादायक घटना घडली.

Thane Child Drowned : घराच्या छतावर सायकल चालवत होता चिमुकला, अचानक तोल गेला अन्...
कळवा खाडीत सात वर्षाचा चिमुरडा वाहून गेला
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : घराच्या छतावर सायकल (Cycle) चालवताना सात वर्षाच्या मुला (Child)चा तोल जाऊन कळवा खाडी (Kalawa Bay)त पडल्याची घटना काल संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. ठाण्यातील खारटन रोड येथील नागसेन परिसरात ही दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि पाण्याचा जोरदार प्रवाहामुळे मुलगा वाहून गेला. या मुलाचा शोध घेण्यासाठी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य (Search Operation) सुरू आहे. काल रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. काल या मुलाचा शोध न लागल्याने आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.

पाऊस आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात मुलगा वाहून गेला

ठाण्यातील खारटन रोड जवळील कळवा खाडी शेजारी असलेल्या नागसेन नगर परिसरात राहणाऱ्या ऋषी उस्वा हा 7 वर्षीय चिमुकला आपल्या कुटुंबासह राहत होता. बुधवारी सायंकाळी हा चिमुकला एका घराच्या छतावर सायकल चालवत होता. मात्र छताला सुरक्षा भिंत नसल्याने या चिमुकल्याचा तोल जाऊन तो खाडीत पडल्याची धक्कादायक घटना घडली. तो खाडीत पडल्यानंतर 10 ते 15 फूट लांब जाईपर्यंत काही लोकांच्या निदर्शनास आला. मात्र पाऊस आणि समुद्राला आहोटी असल्याने पाण्याचा वेग वाशीच्या दिशेने अधिक होता. त्यामुळे नंतर तो दिसेनासा झाला.

एनडीआरएफकडून शोधकार्य सुरु

या घटनेची माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, एनडीआरएफची टीम आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्याचे शोधकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. मात्र त्याचा शोध न लागल्याने आज सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरू करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

या मुलाचा शोध घेण्यासाठी बोट घेऊन पट्टीचे पोहणारे राजेंद्र कोटकर, स्कूबा डायव्हर कर्मचारी आणि बुडालेल्या मुलाच्या काका सोबत महागिरी कोळीवाडा ते ऐरोली ब्रिजपर्यंत संपूर्ण विटावा खाडी, कळवा ब्रिजपर्यंत संपूर्ण खाडी परिसर पिंजून काढला. पण बुडालेल्या चिमुकल्याचा शोध लागला नसल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातं असून ऋषीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (A 7 year old boy fell into Kalwa creek while riding a bicycle)