जबलपूर : महाराष्ट्रात पुण्यातील वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या दादागिरीवर संतापाची लाट उसळली असतानाच मध्य प्रदेशच्या पोलिसांचाही अतिरेक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जबलपूरच्या रांझी पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांनी चोरीच्या संशया (Suspicion)वरून एका निष्पाप मुलाला अत्यंत निर्घृणपणे मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. एका निष्पाप मुलावर पोलिसांकडून झालेल्या या अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. स्कूटरवरून दोन व्यक्ती घराच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मुलापर्यंत पोहोचतात आणि त्याला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेजाऱ्यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही पोलिसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी मुलाला पळवून नेले आणि त्याला जनावराप्रमाणे मारले, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असून त्यामुळे मध्य प्रदेशचे पोलीस टीकेच्या केंद्रस्थानी सापडले आहेत.
निष्पाप मुलाला अमानुष पद्धतीने मारहाण करण्याची ही घटना रांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्ताना चौकातील घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे फुटेज 12 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास चित्रित झालेले आहे. निष्पाप मुलाला मारहाण करणारा आरोपी हा SAF च्या 6 व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे. मुलाने सायकल चोरी केल्याचा संशय या पोलिसाने घेतला आणि याच संशयावरून त्याने निष्पाप मुलाला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मुलाला केलेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. या व्हिडिओसह संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपी पोलिसांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सोशल मीडियावर मुलाच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर जबलपूरच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार फौजदार अशोक थापाविरुद्ध रांझी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक थापाने मस्ताना चौकाजवळ मुलाला रस्त्यात पकडून बेदम मारहाण केली, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेवर तीव्र पडसाद उमटले असून पोलिसांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. (A boy was beaten up by the police on suspicion of theft in Madhya Pradesh)