पुणे / रणजित जाधव : पुण्यातील चाकण तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रांसोबत खेळायला गेलेला 10 वर्षाचा मुलगा संध्याकापर्यंत घरी परतलाच नाही. मग घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र तो कुठेही सापडला नाही. मग घरच्यांनी महाळुंगे पोलिसांकडे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी मुलगा कोणासोबत खेळत होता याची चौकशी केली. मुलासोबत खेळत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. खाणीत पोहायला गेला असता मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुलाच्या मित्रांनी सर्व मित्र खाणीत पोहायला गेल्याची कबुली पोलिसांकडे दिली. पोलिसांनी तात्काळ खाणीच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं असता पाण्याबाहेर मुलाचे कपडे आढळले. यावरुन मुलगा पाण्यात बुडाल्याचं स्पष्ट झालं. पाण्यात त्याचा शोध घेण्यासाठी मावळच्या वन्यजीव रक्षक बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. या पथकाने पाण्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
मुलगा आपल्या मित्रांसोबत खाणीत पोहायला गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्र बुडालेला पाहून मित्र घाबरले अन् ते आपापल्या घरी परतले. घरचे ओरडतील म्हणून त्यांनी याबाबत कोणालाच कळू दिलं नाही. मुलगा बेपत्ता झाला म्हणून घरच्यांनी पोलीस तक्रार दिली असता सर्व प्रकार उघडकीस आला. मुलाच्या मृत्यूची बाब समोर येताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांवक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.