शैलेश पुरोहित, इगतपुरी ( नाशिक ) : भाजप प्रदेश पदाधिकारी तथा नगरसेवक पुत्र विक्रम नागरे आणि भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन राजकीय वर्तुळासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विक्रम नागरे यांनी दिलेल्या खंडणी आणि जीवे मारण्याच्या तक्रारीतील संशयित आरोपीनेच आत्महत्या करून सुसाईड नोट लिहिल्याने खळबळ उडाली आहे. सातपुर पोलीस ठाण्यात विक्रम नागरे यांनी महिनाभरात दोन तक्रारी केल्या होत्या. ज्यामध्ये खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब नमूद केली होती. याच दरम्यान विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला झाला होता, जवळच असलेला बॅनरही फडण्यात आला होता. त्यावरून सराईत गुन्हेगार असलेल्या टोळीवर खंडणी आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आत्महत्या केलेल्या अनिरुद्ध शिंदे यांचाही तक्रारीत समावेश होता.
अनिरुद्ध शिंदे हा सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर विक्रम नागरे यांनी सातपुर पोलीस ठाण्यात खंडणी आणि जीवे मारण्याच्या तक्रारीत अनिरुद्ध शिंदे याच्या नावाचाही समावेश होता.
अनिरुद्ध शिंदे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यामध्ये विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे यांच्या नावाचा समावेश आहे.
दोघांनी खोटे गुन्हे आणि त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे, त्यानुसार शिंदे याचा मृतदेह घेऊन नातेवाईक घोटी पोलीस ठाण्यात पोहचले होते.
रात्री उशिरा शिंदे याच्या मृतदेहासह नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते, त्यानंतर पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज करत केला होता.
रात्री उशिरा विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याशिवाय सातपुर पोलीस ठाण्यात नागरे यांनी दोन तक्रारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती.
माजी मंत्र्यासह माजी प्रदेशाध्यक्ष यांचे निकटवर्तीय आणि बाहुबली म्हणून ओळख असलेल्या नागरे यांच्याकडून दहा लाखांची खंडणी, मोबाइलची मागणी आणि जीवे मारण्याची धमकीची तक्रार दिली जात असल्याने पोलीसांना नागरे यांचा आरोपींचा संबंध असल्याची कुणकुण होती.
एकूणच खंडणी, जीवे मारण्याची धमकी, घरावर हल्ला, सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा आणि आता संशयित आरोपीची आत्महत्या आणि त्यावरून नागरे आणि शहाणे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा नाशिकसह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.