डोंबिवली : डोंबिवलीतील शिवसेना शाखा राडा प्रकरणी महिला पदाधिकाऱ्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना अपशब्द (Abusive) वापरल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. कविता गावंड असे गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना विधानसभा संघटक महिलेचे नाव आहे. मंगळवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा फोटो लावण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला होता. शिंदे गटातील योगेश जुईकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात भादवी 153 अ आणि 505 कलमाअंतर्गत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.
डोंबिवलीमधील शिवसेना शहर शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यावरून मंगळवारी दुपारी ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. शाखेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो काढण्यात आला होता. यांचे फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे गटातील कार्यकर्ते शाखेत गेले होते. त्यावेळी फोटो लावताना दोन्ही गटात जोरदार राडा झाला. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे शाखेला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी मुख्यमंत्र्यांसदर्भात अपशब्द काढले. याप्रकरणी शिंदे गटातील योगेश जुईकर यांनी डोंबिवलीतील राम नगर पोलीस ठाण्यात कविता गावंड यांच्या विरोधात तक्रार दिली. (A case has been registered against Shiv Sena women activist in connection with the fight in Dombivali)