पुणे | 5 जानेवारी 2024 : पुणे शहरातील पर्वती भागात एक भयंकर प्रकार घडला आहे. येथील पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंगावर राख पडल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाचा बदला घेण्यासाठी आपला पिटबुल जातीचा कुत्रा त्याच्या अंगावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पिटबुल जातीच्या भयंकर कुत्र्याच्या चाव्याने या आधी अनेक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाने या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
पर्वती येथील लक्ष्मीनगर शाहु कॉलनीतील रहिवासी आदित्य नितीन आंदेकर आणि त्याचे मित्र गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एका भिंती शेजारी शेकोटी पेटवून अंग शेकत बसले होते. या भिंतीवर ठेवलेली राखेची टोपली आदित्य याच्या अंगावर पडल्याने त्याला राग आला. त्यामुळे आदित्य याने तन्वीर याला शिवीगाळ केली. त्याने मुद्दामहून राखेची टोपली पाडल्याचा आदित्यने आरोप केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन शब्दाला शब्द वाढत जाऊन हाणामारी झाली. त्यावेळी आदित्य याने त्याचा पिटबुल जातीच्या कुत्रीला आदेश देत…’सारा बाईट हिम’ असा आदेश दिला. त्यानंतर पिटबुल जातीच्या कुत्रीने तन्वीरवर हल्ला केला. त्याच्या पाटीला आणि हाताला चावून तिने त्याला जखमी केले.
या घटनेत जखमी झालेले तन्वीर रमजान सईद यांनी या प्रकरणात पर्वती पोलिस ठाण्यात आदित्य आंदेकर याच्या विरुद्ध भादंवि कलम 289, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहे. या पर्वती परिसरात या प्रकारचा हल्ल्याची घटना 21 जानेवारी रोजी देखील घडली होती. पिटबुल हा आक्रमक जातीचा कुत्रा असून त्याच्याद्वारे मनुष्यावर हल्ला करण्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.