मुंबई : मुंबई विमानतळावर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला. यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी स्निपर डॉगच्या मदतीने सामानाची तपासणी केली असता महिलेचा खोटेपणा उघड झाला. सहार पोलिसांनी खोटी बॉम्बची भीती निर्माण केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. महिलेने हे कृत्य करण्याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. सदर महिलेला कोलकात्याला जायचे होते. यासाठी मुंबई-कोलकाता विमानाने प्रवास करणार होती. मात्र विमानतळावर चेकिंग दरम्यान तिने नको ते कृत्य केले अन् ते तिच्याशी अंगाशी आले.
सदर महिला मुंबई-कोलकाता विमानाने कोलकात्याला चालली होती. महिलेकडे अतिरिक्त सामान होते. यामुळे विमानतळावर चेकिंग दरम्यान तिला अतिरिक्त सामानाचे पैसे भरण्यास सांगितले. महिलेकडे दोन बॅगा होत्या, ज्या तिने एअरलाइन कर्मचाऱ्याला चेक-इनसाठी दिल्या होत्या. या विमान कंपनीच्या नियमांनुसार, देशांतर्गत प्रवाशांना फक्त एकच बॅग नेण्याची परवानगी आहे. तसेच या बॅगेचे वजन 15 किलोपेक्षा जास्त नसावे.
महिलेने फ्लाईटच्या एअरलाईन कर्मचाऱ्याकडे बोर्डिंग पासची मागणी केली असता कर्मचाऱ्याने पैसे भरण्यास सांगितले. मात्र महिलेने पैसे भरण्यास नकार देत वाद घालण्यास सुरवात केली. यानंतर कर्तव्यावर असणारे या विमान कंपनीचे ग्राहक सेवा कार्यकारी (CSE) डी ए वाडकर हे विमान कंपनीच्या नियमांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असताना अचानक महिलेने तिच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) अधिकार्यांनी महिलेच्या बॅगेची तपासणी करण्यासाठी स्निफर कुत्र्यांना पाचारण केले. मात्र, बॅगेत काहीही सापडले नाही आणि तिचा दावा खोटा ठरला. यानंतर वाडकर यांच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि 505 (2) (सार्वजनिक उपद्रव घडवून आणणारी विधाने) अंतर्गत तिच्याविरुद्ध पोलीस खटला दाखल करण्यात आला.