नाशिक : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आणि पेशाने प्राध्यापक असलेल्या कारचालकाने चौघांना चिरडले होते. भरधाव वेगाने कार चालवत तीन वाहनांना धडक दिली असून यामध्ये चौघे जखमी आहेत. साहेबराव निकम असे या कारचालकाचे नाव असून नाशिकच्या बिटको मध्ये प्राध्यापक आहेत. नाशिकरोड पासून चांडक सर्कल पर्यन्त भरधाव वेगाने कारचालवत वाहनानां दिलेली धडक सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यात विशेष म्हणजे गाडीचा टायर फुटलेला असतांना निकम याने भरधाव वेगाने कार चालवण्याचा थरार समोर आला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याच घटनेचा संपूर्ण प्रकार पाहून घबराट पसरली होती. या अपघातात दोघे गंभीर जखमी असून एकाच्या पायावरुन कार गेल्याने त्याचे दोन्हीही पाय निकामी होण्याची वेळ आली आहे. यावरुन पोलीसांनी कारचालकावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मद्यधुंद अवस्थेत कारचालवून वाहनांना उडवणे, उडवून पसार होणे, भरधाव वेगाने कार चालवून इतरांच्या जीवाला घोका निर्माण करणे असे विविध आरोप ठेवले आहे.
यामध्ये मद्यधुंद कारचालक साहेबराव निकम याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हाच दाखल करण्यात आला आहे.
निकम हा मदयधुंद अवस्थेमध्ये त्याच्या कारने नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाजवळून थेट चांडक सर्कल पर्यन्त भरधाव वेगाने आला यामध्ये त्याने चौघांना उडवले आहे.
भरदार वेगातील कारचा काही नागरिकांनी पाठलाग सुरू केला तसेच पोलिसांनाही भरधाव वेगातील कारची माहिती कळविण्यात आली होती त्यावरून त्याला पकडण्यात आले होते.
या थरारात अविनाश प्रल्हाद साळुंके, पंकज शंकर मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे,
यामध्ये पंकज मोरे यांच्या पायावरुन कार गेली आहे. असल्याने दोन्ही पायला गंभीर दुखापत झाली आहे, तर साळुंके हे देखील प्राध्यापक असून ते देखील गंभीर जखमी आहे.
पंकज याच्या बहिणीचा काही दिवसांनी विवाह असल्याने पंकजचा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून मद्यधुंद कारचालकावर संताप व्यक्त केला जात आहे.
बिटको महाविद्यालय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – डीजीपी नगर – अशोका मार्ग – लेखा नगर – मुंबईनाका – चांडक सर्कल – जलतरण तलावासमोरील सिग्नल – मायको सर्कल – चांडक सर्कल – शासकीय विश्राम गृह – पुन्हा चांडक सर्कल असा थरार रंगला होता.