अहमदनगर : अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण असे 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आोरपी विरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून कठोर शासन व्हावे यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटना रात्री पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसल्या होत्या. या प्रकरणामुळे तिसगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रविवारी सायंकाळी दोघी अल्पवयीन बहिणी तिसगाव बस स्थानकात उभ्या असताना आरोपीने त्यांची छेड काढत त्यांना मारहाण केली होती. तसेच त्यांचा मोबाईलही तोडला होता.
बसस्थानकातील बहिणींचा छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्यरामनिरंजन वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. यामुळे पुढील अनुचित घटना टळली.
सदर आरोपीवर याआधीही छेडछाडप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी स्थानिक पातळीवर वाद मिटवण्यात आला होता. आता पुन्हा आरोपीने छेडछाड केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.